नक्षलवाद, दहशतवाद यापेक्षाही गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या दरीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला अधिक धोका असल्याचे मत, एनडीटीव्हीचे संरक्षणविषयक पत्रकार नितीन गोखले यांनी रविवारी व्यक्त केले.
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे ‘महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर, ‘एबीपी माझा’चे नाशिक येथील प्रतिनिधी सागर वैद्य आणि ‘लोकमत’च्या नगर आवृत्तीचे छायाचित्रकार राजू शेख यांना ‘देवर्षी नारद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; त्या वेळी गोखले बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जे. बी. जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर आणि कार्याध्यक्ष प्रा. आनंद भिडे या वेळी उपस्थित होते.
नितीन गोखले म्हणाले,‘‘लोककल्याणकारी राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, त्यामध्ये नागरिकांनीही आपले योगदान दिले तरच समाज सुखी होऊ शकेल.’’
डॉ. जे. बी. जोशी म्हणाले,की परकीयांचे ज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यामुळे आपल्या देशात गरिबी आहे. आयात केलेल्या तंत्रज्ञानावर कोणताही देश गरीबच राहतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.
मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दीपा भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद भिडे यांनी आभार मानले.