बालभारतीकडून लवकरच निधीचे वितरण

राज्यभरात झालेल्या पावसात नुकसान झालेल्या १ हजार ४४ शाळांना नुकसान भरपाई म्हणून ५७ कोटींचा निधी बालभारतीकडून देण्यात येणार आहे. या संदर्भातील अहवाल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने बालभारतीला सादर केला असून, निधीच्या वितरणाचे काम लवकरच करण्यात येणार आहे.

तत्कालीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसलेल्या शाळांना ५७ कोटींचा निधी खास बाब म्हणून देण्याची घोषणा केली होती. हा निधी बालभारतीकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी शेलार यांनी २ हजार १७७ शाळांना निधी देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १२ जिल्ह्य़ांतील १ हजार ४४ शाळांचा अहवाल बालभारतीला सादर केला आहे.

‘प्राथमिक शिक्षण परिषदेचे स्थापत्य अभियंते आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती संकलित केली. त्याचा अहवाल बालभारतीला सादर करण्यात आला. त्यानुसार ५७ कोटींचा निधी देण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे. हा निधी देण्यासाठीची पुढील कार्यपद्धती निश्चित करून निधीचे वितरण लवकरच करण्यात येईल,’ अशी माहिती बालभारतीचे  संचालक विवेक गोसावी यांनी दिली.

जास्त नुकसान झालेल्या शाळांचा समावेश

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. त्यात अनेक शाळांचे नुकसान झाले. त्यामुळे ५७ कोटींच्या रकमेत सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसात नुकसान झालेल्या शाळांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसातील नुकसानग्रस्त शाळांचाही समावेश आहे. ज्या शाळा निधी दिल्याशिवाय पूर्ववत होऊ शकणार नाही किंवा जास्त नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीच्या कामाची अंदाजित रक्कम तयार करून बालभारतीला अहवाल देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आली.