नक्षलवादी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)’ या संघटनेतर्फे शहीद दिनी (२३ मार्च) शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकार भवन येथे रात्री अकरा वाजता मोटारसायकलवरून येऊन पत्रके लावणारे तिघे जण तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहेत. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीसुद्धा याच वेळेला शहरात काही ठिकाणी ही पोस्टर लागली होती.
पुण्यात पत्रकार भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गरवारे महाविद्यालय, एसपी महाविद्यालय, नेहरू मेमोरियल हॉल, बालगंधर्व, शनिवारवाडा, शिवाजीनगर न्यायालय अशा ठिकाणी बंदी घातलेल्या भाकप (माओवादी) या संघटनेची पोस्टर लावली आहेत. या पोस्टरमध्ये शहीद भगतसिंग यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने संघर्ष सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर त्याद्वारे ‘सर्व क्रांतिकारकांना राजनैतिक बंदीचा दर्जा द्या, बंदीना भेटताना गुप्ततेने भेटण्याचे अधिकार द्या, क्रांतिकारकांना दिल्या जाणाऱ्या साहित्यावरील प्रतिबंध हटवा,’ आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरात गेल्या वर्षी साधारण याच वेळी महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टर लावली होती.
या घटनेच्या अगोदर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे व ठाणे येथून सात जणांस अटक केली होती. त्यात भाकप-एमच्या गोल्डन कॉरीडॉर कमिटीची सचिव अ‍ॅन्जेलो सोनटक्के उर्फ श्रद्धा ऊर्फ राही, उर्फ इशराका (वय ४२), कबीर कला मंच कार्यकर्ता दीपक ढेगळे यांच्यासह इतरांचा समावेश होता. या प्रकरणी मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचचे सहा जण फरार आहेत. पुणे पोलिसांकडे नक्षलवाद विरोधी स्वतंत्र सेल आहे. मात्र, एका वर्षांनंतर पुन्हा शहरात भाकप (माओवादी) या संघटनेची पोस्टर लागल्याने पुण्यात नक्षलवाद्याचे स्लिपरसेल कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी जंगल भागात आपले वर्चस्व निर्माण केल्यानंतर याचा प्रसार व प्रचार राज्याचा शहरी व इतर ग्रामीण भागात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून भाकप (माओवादी) च्या गोल्डन कॉरीडॉर कमिटीकडे पुणे, मुंबई, ठाणे, अहमदाबाद, नाशिक येथील ग्रामीण भागातील तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कमिटीची सचिव असलेली अ‍ॅन्जेलो ही पुणे, मुंबई परिसरात राहून तरुणांना आकर्षित करत होती. यामध्ये तिला पुण्यातील कबीर कला मंचच्या सदस्यांना नक्षलवादी विचारांकडे आकर्षिक करण्यात यश आले. यातील काही जाणांस एटीएसने अटक केली असली तरी या मंचाचे सहा तरुण गायब असून हे सर्व जण नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.