देशाच्या घटनेने सामान्य नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माध्यमांसह लोकशाहीतील सर्वच घटकांची आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या या अधिकाराचे रक्षण करण्यात प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर दत्ता धनकवडे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.
मुखर्जी म्हणाले, माझी बहुतांश कारकिर्द संसदेच्या आवारातच गेली. अनेकदा माध्यमांनी केलेली टीका मी सकारात्मकपणे घेतली. लोकशाहीत सुसंवाद राखण्यासाठी माध्यमांनी सेतू म्हणून काम केले तरच लोकशाही सशक्त होईल. त्यामुळे लोकशाहीसाठी आवश्यक यंत्रणा सक्षम होण्यास मदत होईल. स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर असलेल्या पुण्याने उद्योग, शिक्षण, राजकारण, सामाजिक सुधारणा अशा विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे.
शरद पवार यांनी आपल्या भाषणातून मातोश्री शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीस, प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. मालतीबाई दास्ताने, बाबुराव जंगम, विठ्ठल महाजन, दुर्गानंद गायतोंडे, शंकरराव होडरकर या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. देसाई यांनी प्रास्ताविक केले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.