19 November 2019

News Flash

राज्यातील दहा जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर कमी

देशातील शंभर जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर ९१८ पेक्षा कमी आहे. त्यापैकी दहा जिल्हे महाराष्ट्रातील आहेत

देशातील शंभर जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर ९१८ पेक्षा कमी आहे. त्यापैकी दहा जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुलींच्या जन्मदराचे सरासरी प्रमाण ९२९ आहे. सांगली, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, बीड, वाशिम, उस्मानाबाद, नगर आणि जालना या दहा जिल्ह्य़ांतील मुलींचा जन्मदर सरासरीपेक्षाही कमी आहे. या जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पातळीवरील बूथस्तराची रचना ३१ डिसेंबपर्यंत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या अभियानाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठकीत डॉ. फडके उपस्थित होते. अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, सदस्या डॉ. अस्मिता पाटील, शहर संघटनमंत्री रवी अनासपुरे या वेळी उपस्थित होते.
डॉ. फडके म्हणाले,‘‘ राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरील समित्यांची रचना पूर्ण करण्यात आली आहे. प्रदेश समित्यांची एकत्रित बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा, वॉर्ड आणि प्रभाग स्तरावर प्रत्येकी ११ आणि बूथस्तरावर दोन सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. भाजपच्या विविध आघाडय़ांतील कार्यकर्त्यांबरोबरच स्त्रीरोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ आणि प्रसिद्धी माध्यमातील तज्ज्ञांचा समितीमध्ये समावेश असेल.’’
माधुरी मिसाळ म्हणाल्या,‘‘स्त्री भ्रूणहत्या आणि मुलगी हे परक्याचे धन या मानसिकतेतून मुलींना जन्म आणि शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटत आहे. महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जनजागृती करून या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, बालक-पालक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तनाद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे.’’
डॉ. अस्मिता पाटील यांनी राज्य सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची माहिती दिली. केंद्र सरकारच्या विमा आणि निवृत्तिवेतन योजना, महिलाविषयक योजना या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on December 1, 2015 3:18 am

Web Title: districts state reduce birth rate girls
Just Now!
X