मुठा कालव्यात पाणी सोडल्यानंतर दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत विभागीय आयुक्तांकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले.
मुठा कालव्यात पाणी सोडल्यानंतर लक्ष्मी आणि कृष्णा धांडे या बहीण-भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आमदार डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांची भेट घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. पाणी सोडताना आमदार, लोकप्रतिनिधी, नागरिकांना माहिती देण्यात आली नव्हती. तसेच त्याची माहिती कालव्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना ध्वनिवर्धकावरून देण्याची आवश्यकता होती. सोडलेले पाणी पिण्यासाठी का अन्य वापरासाठी याबाबत संदिग्धता आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांनी ध्वनिवर्धकावरून सूचना दिल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात सूचना देण्यात आल्या नव्हत्या, असे आढळून आले
आहे, याकडे डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. त्यानुसार विभागीय
आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळविण्यात येणार आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरउपप्रमुख राजेंद्र शिंदे, मनीषा धारणे, संतोष गोपाळ, भरत कुंभारकर, रेखा दीक्षित, नीलेश गिरमे यांचा समावेश होता.