विभागीय अंतिम फेरीचे दावेदार आज ठरणार

एकांकिकेच्या सादरीकरणापूर्वीची हुरहुर.. नेपथ्य आणि अन्य साहित्याची जुळवाजुळव.. एकत्र येऊन उत्कृष्ट प्रयोग सादर करण्यासाठी एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा.. उत्साहाने आणि नेटकेपणाने केलेले सादरीकरण.. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष.. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी असे वातावरण अनुभवायला मिळाले. विभागीय अंतिम फेरीचे दावेदार कोण हे शुक्रवारी (६ डिसेंबर) स्पष्ट होईल.

गेल्या दीड महिन्यापासून महाविद्यालयीन रंगकर्मी ज्याची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ झाला. नाटय़विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी महाविद्यालयीन रंगकर्मीचा अपूर्व उत्साह होता. विभागीय अंतिम फेरीच नाही, तर महाअंतिम फेरीकडेच लक्ष ठेवून विद्यार्थ्यांनी गेले काही दिवस तालमी केल्या आहेत. नेपथ्यापासून संगीतापर्यंत आणि वाचिक अभिनयापासून वेशभूषेपर्यंत प्रत्येक अंगाकडे विद्यार्थ्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे.

या वर्षी पुणे आणि परिसरातील महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्राथमिक फेरीच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांची सादरीकरणासाठीची लगबग सुरू झाली. प्रयोगापूर्वी सर्वाच्याच  मनात एकप्रकारे दडपण होते. सर्वोत्तम प्रयोग सादर करण्यासाठी संघातल्या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यात आल्या. एकाग्रतेसाठी एकत्र येऊन ओमकार लावण्यापासून साहित्याची जमवाजमव सुरू झाली. उत्साहाने आणि एकाग्रतेने एकांकिका सादरीकरण करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण एकांकिकांतून अत्यंत नेटके आणि आशयसंपन्न विषय मांडले. आजच्या वास्तवाला भिडणाऱ्या कथा, अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या विषयांची निवड विद्यार्थ्यांनी एकांकिकांसाठी केली होती. सादरीकरणानंतर एकमेकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी प्रयोगाचा आनंद साजरा केला.

आता प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी, आज आणखी एकांकिका सादर होणार आहेत. प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून निवडक एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहेत. तर विभागीय अंतिम फेरीतून सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या एकांकिकेला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

‘लोकसत्ता’ आयोजित सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा

सपोर्टेड बाय – अस्तित्व

पॉवर्ड बाय – आयओसीएल

असोसिएट पार्टनर – मे. बी. जी. चितळे डेअरी

 टॅलेन्ट पार्टनर – आयरिस प्रॉडक्शन