संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर एकाचवेळी कारवाई करणे शक्य व्हावे तसेच कारवाईसाठी मनुष्यबळ आणि अन्य सुविधाही तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विभागीय स्तरावर अतिक्रमण निर्मूलन पथके आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी सातत्याने जी कारवाई लागते ती प्रभावीपणे करता यावी, यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्य भवनातील अतिक्रमण निर्मूलन पथकासह शहरात चार विभागांमध्ये चार स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. अतिक्रमण कारवाई सध्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केली जाते. मात्र, अशी कारवाई करताना अनेकदा मनुष्यबळाची कमतरता भासते. त्यामुळे प्रत्येक मोठय़ा कारवाईपूर्वी महापालिकेच्या मुख्य अतिक्रमण पथकाकडे मनुष्यबळाची मागणी करावी लागते. प्रत्येकवेळी या पथकाकडून मदत मिळतेच असे होत नाही. त्यामुळे कारवाईवर मर्यादा येतात. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चार विभागांमध्ये चार पथके स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विभागीय स्तरावर पथके स्थापन झाल्यास कारवाईचा निर्णय विभागीय स्तरावर घेऊन त्याची अंमलबजावणी करणे लगेच शक्य होईल.
विभागीय स्तरावर शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक आदी पदे निर्माण केली जातील. तसेच अतिक्रमणांवरील कारवाईसाठी लागणरे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री देखील विभागीय स्तरावरच उपलब्ध करून दिली जाईल. चार विभागीय पथकांमध्ये कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे दीडशे जणांची नियुक्ती केली जाणार आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशानुसार सुरू झालेली ही कारवाई आठ-पंधरा दिवसातच बारगळली होती. संपूर्ण शहरात एकाचवेळी कारवाई करण्यासाठी यंत्रणा विकेंद्रित असणे आवश्यक होते. त्यानुसार आता विभागीय पातळीवर ही यंत्रणा चार ठिकाणी तयार केली जात आहे.