तेरा दिवसांच्या बाळाला त्याच्या आई वडिलांनीच पुरुन टाकल्याचा प्रकार पुण्यातल्या सिंहगड रोड भागात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवरील वडगा परीसरातल्या झाडांमध्ये या बाळाला पुरण्यात आलं. सिंहगड कॉलेजच्या मागच्या बाजूस असलेल्या दाट झाडांच्या परिसरात पाहणी केली असता तिथे एका खड्ड्यात बाळाला पुरण्यात आलं आहे. ते खोदण्या करिता प्रशासकीय परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच खड्डा खोदता येणार असल्याने अधिकारी परवानगीसाठी गेल्याचे सांगण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सिंहगड पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.

सिंहगड रोड भागातील वडगाव बुद्रुक या ठिकाणी सिंहगड कॉलेजच्या मागे गोदावरी नावाचं हॉस्पिटल आहे. या भागात जंगल असल्याने तिथे नागरिकांची ये-जा कमी प्रमाणात असते. याच भागातल्या एका दाम्पत्याने १३ दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला. हे बाळ दिव्यांग जन्माला आल्याने आई वडिलांनी त्याला जंगलात खड्डा खोदून पुरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी धाव घेतली. तहसीलचे अधिकारी आल्यावर या ठिकाणी खोदकाम सुरु होणार आहे. ही माहिती समजल्यावर परिसरातल्या लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती.