शाळांना दिवाळीच्या सुटय़ा लागल्या, की चाकरमाने प्रकाशाचा हा उत्साही सण साजरा करण्यासाठी मूळ गावी परतू लागतात अन् लाखो पावले एसटीकडे वळतात.. प्रवाशांची गरज पाहता दिवाळीचा सुरळीत प्रवास घडविण्यासाठी एसटी प्रशासनही कंबर कसते.. राज्याच्या वेगवेगळ्या भागात चोवीस तास जादा गाडय़ा सोडल्या जातात. या सर्वातून इतरांची दिवाळी साजरी होत असली, तरी सणाच्या या आनंदातून एसटीचा चालक, वाहक व इतर कर्मचारी मात्र नेहमीच वंचित राहतात. त्यांची दिवाळी चार चाकांवर धावणाऱ्या सेवेच्या विश्वातच निघून जाते.. कित्येकांना सणाच्या काळात कुटुंबीयांचे चेहरेही पाहता येत नाहीत!
सध्या सर्वच एसटी स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळते आहे. उपलब्ध असलेल्या त्याच वाहक व चालकांच्या जीवावर हजारो जादा गाडय़ा चालविण्यात येत आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ अनेक फेऱ्यांवर चालक, वाहकांना काम करावे लागत आहे. इतर अनेक जण सुटी घेऊन दिवाळीची खरेदी करण्याबरोबरच दिवाळी साजरी करण्यासाठी मूळ गावाकडे जात असताना एसटीचे चालक, वाहकांच्या दिवाळीचे काय, हा प्रश्न घेऊन काही चालक, वाहकांना बोलते केल्यानंतर दिवाळी साजरी करता येत नसल्याची बोचरी खंत प्रत्येकाकडून व्यक्त झाली. मात्र, सणाच्या कालावधीत प्रवाशांना देत असलेल्या सेवेबाबतचा आनंद व अभिमानही काहींनी व्यक्त केला.
दिवाळीच्या कालावधीत सुटी मिळत नसल्याने घरी जाता येत नाही. त्यामुळे दिवाळीत कुटुंबीयांचे चेहरेही दिसत नाहीत, असे वेदना मांडत एसटीचे चालक वसंत वाघ म्हणाले, ‘दोन फेऱ्यांमधल्या वेळात स्थानकातील विश्रामगृहातच थोडीशी उसंत मिळते. एकापाठोपाठ एक फेऱ्या कराव्या लागतात. पण, नोकरी व प्रवाशांची सेवा म्हणून चार चाकांवरील धावपळीतच आमची दिवाळी निघून जाते.’
चालक लक्ष्मण चौकटे म्हणाले, ‘दिवाळीत सर्व जण घरी, पण आम्ही नोकरीवर असतो. कुटुंबीयांना दिवाळीसाठी गावी पाठवून देतो व मी सेवेत असतो. मी इकडे असल्याने कुटुंबीयांना माझ्याविना दिवाळी साजरी करण्यास उत्साह वाटत नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी गरजेच्या दिवसात आम्ही सण साजरा करू शकत नाही.’ चालक डी. एल. दुसांगे म्हणाले, ‘जनतेची सेवा करण्याचा आमचा व्यवयाय आहे. त्यामुळे दिवाळीत घरी जाता येत नसल्याबद्दल आता काही वाटत नाही. किंचितसा वेळ मिळाला की घरच्यांसाठी दिवाळीची खरेदी करून देतो. पण पुन्हा कामावर रुजू व्हावे लागते. नोकरी करायची आहे, त्यामुळे पर्याय नाही.’
चोवीस तास राबूनही बोनस नाही..
नागरिकांचा रोष मात्र पत्कारावा लागतो
राज्य परिवहन महामंडळात कामाला आहोत, असे सांगितले की समोरच्याला बरे वाटते. पण, ‘दुरून डोंगर साजरे’ अशीच आमची स्थिती आहे. शासनाच्या इतर सेवांमध्ये चांगले वेतन मिळत असताना सर्वाधिक राबणाऱ्या एसटीच्या कामगाराला तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते. दिवाळीत चोवीस तास राबूनही बोनस मिळत नाही.. दिवाळी गडबडीची असते. कधी गाडीला उशीर होतो.. गडबडीत कुणाला धक्का लागतो, त्या वेळी नागरिकांना रोष पत्कारावा लागतो. प्रसंगी मारही मिळतो.. अशी तीव्र वेदना एसटीचे चालक लक्ष्मण चौकटे यांनी व्यक्त केली. एसटीमध्ये ११ वर्षे सेवा दिल्यानंतर आता माझे वेतन १२ हजार रुपये आहे. निवृत्त होईपर्यंत २४ ते २५ हजारांच्या पुढे वेतन जात नाही. कामामुळे दिवाळी साजरी करता येत नाही, साजरी करायची ठरली तरी मोठा खर्च करता येत नाही, अशी खंतही त्यांनी मांडली.