दिवाळी म्हणजे फराळ.. या समीकरणाला पूर्वी जोड होती ती घरोघरी पोहोचणाऱ्या फराळाच्या डब्यांची! मग कुणाच्या घरच्या अनरश्याची वाट पहिली जायची, तर कुणाकडचा चिवडा भाव खाऊन जायचा. शेजारी, ओळखीचे, नातेवाईक यांना फराळाचे डबे देण्याच्या हिशोबानेच घरोघरी फराळ तयार होत असे. आता या फराळाच्या डब्यांचे स्वरूप बदलले आहे आणि या फराळाने थेट परदेशाची वाट धरली आहे. हजारो किलोचा फराळ दरवर्षी परदेशी पाठवला जात आहे.
दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातला खाऊ चवीसाठी, कौतुकाने दुसऱ्याच्या घरात देण्याच्या प्रथेला आता वैश्विक स्वरूप मिळाले आहे. बदललेल्या परिस्थितीत आपल्या कॉलनीमध्ये, शेजारी फराळ वाटण्याची पद्धत कमी झाली असली, तरी परदेशी असलेल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आवर्जून फराळ पाठवला जात आहे. दरवर्षी हजारो किलो फराळ परदेशात जात आहे.
परदेशी फराळ पाठवण्यासाठी विविध सवलती, ऑफर्स देण्याची विविध कुरिअर कंपन्यांमध्ये चढाओढच लागली आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी आठ दिवस या कंपन्यांचे काम सुरू होते आणि दिवाळी झाल्यानंतरही पुढील चार दिवस फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध असते. अनेक कुरिअर कंपन्यांनी मिठाईची दुकाने, तयार फराळ उपलब्ध करून देणारे व्यावसायिक यांच्याशीही संधान बांधले आहे. फराळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनीही परदेशी पाठवण्यासाठी तयार पॅकही उपलब्ध करून दिले आहेत. घरी तयार केलेले पदार्थही परदेशी असलेल्या आप्तेष्टांना पोहोचवण्याचे काम या कंपन्या करतात. फराळ परदेशी पाठवण्यासाठी साधारण चारशे रुपये किलो ते साडेपाचशे रुपये किलो असे शुल्क आकारले जाते.
गेली काही वर्षे फराळ पाठवण्याच्या या उलाढालीला परदेशी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीनेही साथ दिली आहे. आपल्या नातेवाईकांबरोबरच परदेशी असलेल्या व्यावसायिक भागीदार किंवा कंपनीच्या परदेशातील शाखेतील सहकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणूनही आवर्जून फराळ पाठवला जातो. अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये सर्वाधिक फराळ पाठवला जातो. त्याचबरोबर मॉरिशस, सिंगापूर, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दुबई या देशांमध्येही काही प्रमाणात फराळ पाठवला जातो, अशी माहिती डीटीडीसी कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिली.
याबाबत पाळंदे कुरिअर्सचे आशिष पाळंदे यांनी सांगितले, ‘या वर्षी पहिल्यांदाच आम्ही तयार फराळाची पाकिटे पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी तयार फराळ असणाऱ्या विविध कंपन्यांचे स्टॉल्स आम्ही आमच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात उभे केले होते. त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. साधारण २० हजार किलो फराळ आतापर्यंत परदेशी पाठवण्यात आला आहे.’

It is mandatory to give the information to the police station about the citizens coming to live from abroad
परदेशातून राहायला येणाऱ्या नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक; पोलिसांचा मनाई आदेश लागू
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
dr sudhir mehta pinnacle industries, pinnacle industries dr sudhir mehta
वर्धापनदिन विशेष : वाहन निर्मितीतील नावीन्याचा ध्यास
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार