दिवाळीचा आनंद सारेजण अनेकविध प्रकारे साजरा करत असताना जे अनाथ आहेत, ज्यांना कोणीच नाही, त्यांच्या दिवाळीचे काय, असा प्रश्न पुण्यातील काही युवकांना पडला. त्यांनी ठरवले की, अनाथांसाठी विशेषत: अनाथ मुलींसाठी, उपेक्षित मुला-मुलींसाठी काही तरी करूया. त्यांची केवळ दिवाळीच नाही, तर त्यांना वर्षभर आनंद वाटेल असे काही तरी करूया. त्यातून हजारो पणत्या तयार करून, त्या रंगवून पुण्यात त्यांची विक्री करण्याचा उपक्रम या युवकांनी सुरू केला आणि त्यांच्या या उपक्रमातून अनाथ मुलींनाही दिवाळीचा आनंद मिळायला लागला.
अनाथ मुलींना दिवाळीचा आनंद देणारा हा उपक्रम पुण्यातील ‘मैत्र युवा फाऊंडेशन’तर्फे केला जातो. संस्थेचे अध्यक्ष संकेत देशपांडे हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि संस्थेतील सर्व अठरा ते बत्तीस या वयोगटातील युवक-युवती हे देखील सर्वजण उच्चशिक्षित आहेत. वास्तुविशारद, वेगवेगळ्या शाखांचे अभियंते, संगणक तज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञान अभियंते अशा सर्वाच्या सहभागातून हा उपक्रम सुरू आहे. कोथरूडच्या बाल सदनमधील अनाथ मुलींसाठी तसेच देवदासींच्या मुला-मुलींसाठी ‘मैत्र’चे कार्यकर्ते गेले दोन महिने सातत्याने काम करत आहेत. सुटीच्या दिवशी वा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे सर्वजण संस्थेत जातात आणि मुलींबरोबर पणत्या तयार करतात. तयार झालेल्या पणत्या आकर्षक दिसण्यासाठी सुरेखपणे रंगवाव्या लागतात. पणत्यांवर कलाकुसर करावी लागते आणि तेही काम या मुलींच्या मदतीने हे कार्यकर्ते करतात. तयार झालेल्या या सुंदर पणत्या मुलींच्या मदतीने विक्रीचाही उपक्रम शहरात विविध भागात केला जातो.
तयार झालेल्या पणत्यांच्या विक्रीसाठी दिवाळीच्या आधीपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत रोज संध्याकाळी स्टॉल लावले जातात आणि त्या माध्यमातून पणत्यांची विक्री केली जाते. सध्या असे स्टॉल रोज लावले जात आहेत. मुख्य म्हणजे या विक्रीतून जे पैसे मिळतात ते बाल सदनमधील मुलींनाच दिले जातात. त्यातून त्यांना स्वकमाईचा जो आनंद मिळतो तो त्यांच्यासाठी संस्मरणीय असतो. मैत्रिणींनो, दिवाळी तुमच्यासाठीही आहे, हाच संदेश या निमित्ताने ‘मैत्र’ संस्था देते.

आम्ही कोणी कलाकार नाही; पण आकर्षक पणत्या तयार करायच्या आणि त्यांची विक्री करून येणारे पैसे अनाथ मुलींना द्यायचे हा आमचा उपक्रम दरवर्षी यशस्वीरीत्या सुरू आहे. एखाद्या कामासाठी पैसे देणे एकवेळ सोपे आहे; पण वेळ देणे अवघड आहे. सध्याच्या तरुण पिढीने सामाजिक कामासाठी थोडातरी वेळ दिला पाहिजे या जाणिवेतून आम्ही हे काम करतो. त्यातून आम्हाला समाजाच्या दुसऱ्या बाजूचेही दर्शन घडते आणि अनाथ मुलींनाही मदत होते.
संकेत देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, मैत्र युवा फाऊंडेशन