राज्यातील प्राध्यापकांना केंद्र शासनाने दिवाळी भेट दिली असून सहाव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची रक्कम राज्याला मिळाली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाकडून विभागीय शिक्षण संचालनालयाला रक्कम वितरित करण्यात आली आहे.
सहाव्या वेतन आयोगातील फरक मिळावा या मागणीसाठी राज्यातील प्राध्यापकांचा गेली दोन वर्षे लढा सुरू होता. राज्यातील प्राध्यापकांची सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ही साधारण पंधराशे कोटी होती. केंद्र शासनाने फरकाची रक्कम दिल्यानंतर ती देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार पाचशे कोटी प्रमाणे तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम प्राध्यापकांना देण्याचे शासनाने मान्य केले होते. या रकमेचे तीनही टप्पे केंद्राकडून आता मिळाले आहेत.
प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगातील फरकाचा ४३५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राध्यापकांना जून महिन्यातच वितरित करण्यात आला होता. आता केंद्राकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची रक्कम राज्याला देण्यात आली आहे. दुसरा आणि तिसरा टप्पा मिळून ८९५ कोटी रुपयाचा फरक केंद्राने दिला आहे. राज्याकडूनही ही रक्कम विभागीय संचालक कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे.
याबाबत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. पी. आर. गायकवाड यांनी सांगितले, ‘‘शासनाकडून फरकाची सगळी रक्कम मिळाली असून ती दिवाळीपूर्वी विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे. रकमेच्या वितरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही विभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. प्राध्यापकांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होईल.’’