पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा निर्णय

दिवाळीची चाहूल लागली, की विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांची रांग लागते, असे चित्र अनेक वर्षांपासून पिंपरी पालिकेत तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दिसून येत होते. तथापि, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यंदा ही परंपरा मोडीत काढली. अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे आदेश त्यांनी बजावले. त्यानुसार, कार्यालयांमध्ये भेटवस्तू येणे बंद झाले. मात्र, कार्यालयांबाहेर आणि थेट निवासस्थानी सुरक्षितपणे भेटवस्तू स्वीकारण्याची पळवाट शोधून आयुक्तांच्या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखवण्यात आली.

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले. त्यानुसार, अशाप्रकारे भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांना पालिकेच्या वास्तूत प्रवेश न देण्याच्या सूचना सुरक्षा विभागास देण्यात आल्या. आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भेटवस्तू घेऊन येणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात येऊ लागला. मात्र, आलेली भेटवस्तू सोडायची नाहीच, अशी भावना असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला शिस्तीत केराची टोपली दाखवली. ठेकेदार, पुरवठादार अथवा मोठय़ा कंपन्यांचे प्रतिनिधी भेटवस्तू घेऊन आल्यास संबंधित अधिकाऱ्याला बाहेरूनच दूरध्वनी येतो. त्यानुसार, अधिकारी  कर्मचाऱ्याला मुख्यालयाबाहेर अथवा क्षेत्रीय कार्यालयाबाहेर पाठवून देतो. भेटवस्तू स्वीकारली जाते आणि साहेबाच्या मोटारीत ठेवली जाते. अथवा, साहेबाच्या घरी पोहोचवली जाते. अधिकाऱ्याला भेटवस्तू मिळते व त्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बक्षिसी मिळते, असेच सर्रास दिसून येत आहे.

पिंपरी पालिकेतील एकही विभाग असा नाही, जेथे भ्रष्टाचार होत नाही. आपल्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांना खर्चिक भेटवस्तू देणे, हा त्याचाच एक भाग आहे. दिवाळीची चिन्हे दिसू लागताच पालिका अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणाऱ्यांची रांग लागते, हे अनेक वर्षांपासून सुरू होते. मोठी वाहने भरून भेटवस्तू आणल्या जात होत्या आणि त्याचे वाटप संपूर्ण इमारतीत केले जात होते. पालिकेतून बाहेर पडणाऱ्यांच्या हातात अशा भेटवस्तूंची गर्दी, हे नेहमीचे चित्र होते. मात्र, त्यास कोणी आक्षेप घेत नव्हते म्हणूनच बिनबोभाट हा प्रकार वर्षांनुवर्षे सुरू होता. आयुक्तांनी तो प्रकार बंद करण्याचा प्रयत्न केला. आता कार्यालयांमध्ये भेटवस्तू येत नसल्या, तरी त्या थेट मोटारीत आणि घरी पोहोचवण्याची पळवाट शोधून अधिकाऱ्यांनी दिवाळीचा ‘खाऊ’ सोडायचा नाही, ही मानसिकता दाखवून दिली आहे.