राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर वाढदिवस आणि समारंभाचा थाटमाट न करता त्याऐवजी मराठवाडय़ातील एखाद्या गावाला दिवाळीत मदत करू या, असा विचार नगरसेवक दिलीप काळोखे यांनी कृतिरूप केला आहे आणि त्यांच्या या कृतीला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. किमान एकवीस हजार किलो धान्य गोळा करून ते दिवाळीच्या निमित्ताने गरजू कुटुंबांना देण्याचा संकल्प काळोखे यांनी केला होता आणि गेल्या तीन आठवडय़ात तब्बल चाळीस हजार किलो धान्य जमा झाले आहे.
वाढदिवसाला येताना पुष्पगुच्छ वा कोणतीही भेटवस्तू न आणता जे काही द्यायचे असेल, ते दुष्काळग्रस्तांना धान्यरूपाने द्या, असे आवाहन नगरसेवक काळोखे यांनी मित्रांना आणि परिचितांना केले होते. त्यांचा वाढदिवस २ ऑक्टोबर रोजी होता. त्या समारंभातच त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी एकवीस हजार किलो धान्य गोळा करण्याचा संकल्प केला. या चांगल्या उपक्रमाला साथ देण्यासाठी त्यांचे अनेक मित्र आणि काही संस्थाही पुढे आल्या. अनेकांनी धान्य दिले, तसेच अनेकांनी धान्य खरेदीसाठी धनादेश दिले. प्रतिसाद वाढत गेला, तसा काळोखे यांचा संकल्पही पूर्ण झाला आणि चाळीस हजार किलो धान्याचा टप्पाही ओलांडला जाईल एवढा प्रतिसाद मिळाला आहे.
मराठवाडय़ातील निलंगा तालुक्यात अन्सारवाडा हे छोटे गाव आहे. तेथे भटके विमुक्त समाजातील ७३ कुटुंबांना घरे देण्यात आली आहेत. या कुटुंबांना, तसेच निलंगा गावातील १२५ कुटुंबांना ५ नोव्हेंबर रोजी हे धान्य व फराळ दिला जाईल. पहिल्या टप्प्यात सहा हजार किलो गहू, पाच हजार किलो तांदूळ, एक हजार किलो साखर, एक हजार लिटर तेल तसेच मीठ, मिरची, मसाला आणि सुवासिक तेल, उटणे, साबण, आकाशकंदील आदींचे वाटप केले जाणार आहे. त्या बरोबरच लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली वगैरे फराळाचे पदार्थही खास स्टिलच्या डब्यातून या कुटुंबांना भेट दिले जातील. भावे हायस्कूलमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभातून धान्य घेऊन जाणारे ट्रक मराठवाडय़ाकडे रवाना होतील.

सर्वांची मदत उत्साह वाढवणारी
दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी धान्य गोळा करून देण्याचा माझा संकल्प अनेकांनी केलेल्या छोटय़ा-मोठय़ा मदतीतून तीन आठवडय़ातच पूर्ण झाला. नगरसेवक म्हणून मला मिळत असलेले पाच महिन्यांचे छत्तीस हजार रुपये एवढे मानधनही मी धान्यखरेदीलाच वापरले आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्य़ातील कुटुंबांना धान्य देण्याचा संकल्प आहे.
दिलीप काळोखे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ५०