उत्सवाच्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

पुणे : दिवाळीनंतर प्रामुख्याने उत्तरेकडून पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरूच असल्याचे रेल्वे गाड्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता अनेक तात्पुरत्या गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

करोनाच्या टाळेबंदीनंतर मोठ्या प्रमाणावरील कामगार, मजूर मूळ गावी परतले होते. शिथिलता देण्यात आल्यानंतर शहराकडे पुन्हा त्यांचा ओघ सुरू झाला. सध्या जवळपास सर्वच विभाग सुरू करण्यात आले आहेत. उद्योग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे करोनाच्या कालावधीत बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात पूर्ण क्षमतेने कामगारांची आवश्यकता निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सणानंतर आणखी कामगार शहरात परततील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार सध्या प्रामुख्याने उत्तरेकडील गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद लक्षात घेता दिवाळीसाठी सुरू केलेल्या आणि काही विशेष गाड्यांनाही मुदतवाढ देणचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोरखपूर-पुणे ही विशेष साप्ताहिक गाडी २ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी पुण्यातून, तर  गुरुवारी गोरखपूरहून सोडण्यात येणार आहे. पुणे-संत्रागाची (पश्चिाम बंगाल) या गाडीला २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर शनिवारी संत्रागाची, तर सोमवारी पुण्यातून सोडण्यात येते. उत्सव विशेष पुणे-जयपूर गाडीला ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ असून, पुण्यातून ती बुधवार आणि रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता सुटेल. जयपूर-पुणे ही गाडी आता २९ डिसेंबरपर्यंत धावणार असून, जयपूरहून मंगळवार आणि शनिवारी ती दुपारी १२.२० वाजता पुण्यासाठी सोडण्यात येईल. पुणे-जबलपूर ही विशेष उत्सवी गाडीही आता २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. पुणे-दरभंगा विशेष गाडी ३० डिसेंबरपर्यंत, तर दरभंगा-पुणे ही गाडी १ जानेवारी २०२१ पर्यंत धावणार आहे. पुणे-लखनऊ गाडीलाही मुदतवाढ देण्यात आली असून, दोन्हा बाजूने या गाडीची सेवा ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पुणे-मांडुआडीह (उत्तर प्रदेश) गाडी ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

पुणे-इंदौर गाडी आता दौंडपर्यंत

पुणे-इंदौर या गाडीचा विस्तार आता दौंड रेल्वे स्थानकापर्यंत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार ५ डिसेंबरपासून दौंड-इंदौर ही गाडी प्रत्येक सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी दौंड स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटेल. पुण्यात दुपारी ३.३० वाजता येईल. इंदौर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. इंदौरवरून प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी ही गाडी दुपारी ४.३० वाजता सुटून पुणे स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५५ वाजता येईल. दौंडला ही गाडी सकाळी १०.२० वाजता पोहोचेल.