17 December 2018

News Flash

आळंदीत माऊलींचा ७२२ वा संजीवन समाधी सोहळा

लाखो भाविकांची अलंकापुरीत गर्दी

आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त देवाच्या आळंदीत महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली आहे. टाळ-मृदुगांच्या गजराने आळंदीनगरी दुमदुमून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी वारकऱ्यांनी कर्जातून मुक्ती करण्यासाठी सरकारला सुबुद्धी देण्यासह इतर संकटं दूर करण्याचं साकडं माऊली चरणी घातलं.
ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधीला नवीन पोशाख घातला गेला. प्रदक्षिणा सोहळ्यात अलंकापुरीत आलेले भाविक सहभागी होऊन अगदी देहभान हरपून नाचताना दिसले.

यावेळी संपूर्ण आळंदीत श्री जगदगुरू ज्ञानोबारायांचा जयजयकार सुरु होता. कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो. पवित्र इंद्रायणीच्या काठी आणि मंदिराच्या वीणा मंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या व भारुडे सादर करण्यात मग्न होत्या. तर देहभान विसरून वारकरी हरिनामाचा गजर करत सोहळ्याचा अनुभव घेत होते. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२२ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरवात झाली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविेक आळंदीत दाखल झालेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु ठेवला होता.

First Published on November 14, 2017 4:01 pm

Web Title: dnyaneshwar maharaj 722 th sanjivan samadhi ceremony alandi