News Flash

हरिभक्तीच्या उत्साहात माउलींच्या चलपादुकांचे प्रस्थान

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पहाटे चार वाजता घंटानादाने सुरुवात झाली.

पिंपरी : टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिभक्तीत तल्लीन झालेल्या वैष्णवांच्या संगतीने शुक्रवारी संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या चलपादुकांनी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला असला, तरी सोहळ्याच्या उत्साहात कोणतीही उणीव जाणवली नाही. ‘माउली माउली’ अशा जयघोषाने संजीवन समाधी मंदिराचा परिसर भक्तिरसात दुमदुमला.

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पहाटे चार वाजता घंटानादाने सुरुवात झाली. त्यानंतर काकडा आरती करण्यात आली. सव्वा चार ते साडेपाच पर्यंत पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती झाली.

सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान वीणा मंडपामध्ये भागवत महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान मंदिराचा गाभारा स्वच्छ करून समाधीला पाणी घालण्यात आले आणि श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी साडेचार वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. पाच वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या हिरा आणि मोती अश्वांचा देऊळवाडय़ात प्रवेश झाला. त्यानंतर श्रीगुरू हैबतराव बाबामहाराज यांच्यातर्फे श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानतर्फे श्रींची आरती झाली. आरतीनंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला.

मानपानाच्या कार्यक्रमानंतर श्रींच्या पादुका वीणामंडपात आणण्यात आल्या. वीणामंडपात संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाचे पागोटे देऊन श्रीगुरू हैबतरावबाबामहाराज यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास श्रींच्या पादुकांचे वीणामंडपातून प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा करून आजोळघरी दर्शनमंडप सभागृहात पादुका विराजमान झाल्या. त्यानंतर सामाज आरती करण्यात आली. २० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पालखी एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.

प्रस्थान सोहळ्याला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार संजय जाधव, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह संस्थानचे सर्व पदाकिारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:04 am

Web Title: dnyaneshwar mauli palkhi prasthan from alandi to pandharpur zws 70
Next Stories
1 पुन्हा एकदा कलाकारांचा कट्टा भरावा
2 पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी करोनाबाधित
3 पुणे रेल्वे स्थानकात मत्स्यालयाचा आनंद