सविता मराठे यांनी लिहिलेल्या ‘करिअर प्लॅनिंग आफ्टर टेन्थ अँड ट्वेल्थ, ए टीन्स गाइड टु चूज द राइट पाथ’ या पुस्तकाचे प्रकाशन येथील ‘एनरूट करिअर अ‍ॅडव्हायजर’ संस्थेमध्ये ज्येष्ठ करिअर सल्लागार डॉ. श्रीराम गीत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रकाशन कार्यक्रमात ‘श्यामची आई फाउडेशन’च्या संस्थापक विश्वस्त शीतल बापट, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर, विश्व प्रेसचे विशाल सोनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘या पुस्तकात सध्या उपलब्ध करिअर संधींबाबत माहिती देण्यात आली असल्याने ते विद्यार्थी व पालक या दोघांसाठीही उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल, असे सविता मराठे यांनी या वेळी सांगितले. मराठे या शिक्षणतज्ज्ञ, कुशल प्रशिक्षक आणि करिअर सल्लागार आहेत. त्यांची ‘एनरूट’ ही करिअर सल्ला संस्था आहे. त्या म्हणाल्या, की करिअरचे नियोजन ही कठीण प्रक्रिया असून तिच्या प्रत्येक पायरीवर काटेकोर विचार व निर्णय घेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया दहावी व बारावीच्या पातळीवरच सुरू होते, जेथे विद्यार्थी विशिष्ट विद्याशाखा निवडतात. या विचारातूनच मी हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झाले.
सध्या करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र दहावी व बारावीच्या टप्प्यावर योग्य विद्याशाखा निवडणे गरजेचे असल्याने असंख्य पर्यायांमुळे पालक व विद्यार्थी गोंधळून जातात. कोणत्या विद्याशाखेतून कोणते करिअर घडवता येईल, हा विचार करणे अवघड असते. कारण करिअरच्या पर्यायांच्या संख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी निवडण्याच्या विद्याशाखांची (विज्ञान, वाणिज्य, कला, पदविका वगरे) संख्या खूपच मर्यादित आहे, असेही मराठे यांनी सांगितले.
शीतल बापट म्हणाल्या, की करिअर समुपदेशन हे विज्ञान आणि तंत्र आहे. उत्तम करिअर समुपदेशक विद्यार्थ्यांना योग्य मार्ग निवडण्यास मदत करत असतो. ‘करिअरच्या चाकोरीबद्ध मार्गामागे धावण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांने इच्छित करिअर निवडण्यापूर्वी प्रथम स्वतची आवड लक्षात घेतली पाहिजे आणि पालकांनीही आपल्या पाल्याच्या निर्णयाला पाठबळ दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केली.