या देशात एका व्यक्तीचे नाव घेऊन कधीच निवडणूक लढविली गेली नाही. पंतप्रधान निवडीचा खासदारांचा अधिकार काढून घेत या व्यक्तीसाठीच मतदान करा, असे सांगत स्वत:च्या पक्षाला वेठीला धरण्याचे काम ही वेगळ्या हुकूमशाहीची सुरूवात आहे. देशाचा इतिहास, भूगोल आणि समाजरचना माहीत नसलेले, लोकशाही संस्थेतील महत्त्वाची पदे उद्ध्वस्त आणि बदनाम करण्याची भूमिका सातत्याने सभेत मांडणारे देशाला आणि समाजाला कसे पुढे नेणार? अशा हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करा, असे आवाहन करीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता हल्ला चढविला.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, रमेश बागवे, शरद रणपिसे, जयदेव गायकवाड, अनिल भोसले, मोहन जोशी, चंचला कोद्रे, बंडू गायकवाड, अभय छाजेड, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे या वेळी उपस्थित होते.
मोदी वध्र्याला सेवाग्राम येथे गेले आणि महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’चा नारा येथून दिला असे त्यांनी सांगितले. पण, ‘भारत छोडो’चा नारा हा मुंबईच्या गवालिया टँक येथून दिला गेला होता हा देशाचा इतिहास ज्यांना माहीत ते देशाचे भवितव्य काय घडविणार असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
समाजकारणामध्ये नवी पिढी घडविण्याची आवश्यकता ध्यानात घेऊन पुण्यातील चारही उमेदवार तरूण दिले आहेत. १९६७ मध्ये यशवंतरावांनी माझ्यासह राज्यातील विविध भागांतील कृष्णचंद्र मोहिते, प्रतापराव भोसले, गोिवदराव आदिक, अंकुश टोपे अशा युवकांना संधी दिली होती. हाच विचार आता आमच्यासमोर आहे, असे सांगून पवार म्हणाले, लोकांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम आघाडी सरकारने गेली दहा वर्षे केले आहे.गरिबांना स्वस्तामध्ये अन्नधान्य देणारा जगामध्ये कोठेही नाही असा अन्न सुरक्षा कायदा केला आहे. हा गाडा पुढे न्यायचा असेल तर देशामध्ये पुन्हा आघाडीचेच सरकार आले पाहिजे.
बाहेरचा कोण
विश्वजित कदम यांचा उल्लेख बाहेरचा उमेदवार असा होत असल्याबद्दल शरद पवार म्हणाले, काकासाहेब गाडगीळ कोकणातील होते. मोहन धारिया महाडचे आणि एस. एम. जोशी रत्नागिरीचे होते. कलमाडी कुठले आहेत हे काही मी सांगण्याची आवश्यकता नाही. कलमाडींनाही आपण आपला मानलेत. ज्या पतंगरावांनी पुण्याच्या कर्मभूमीत भारती विद्यापीठाच्या माध्यमातून ५० वर्षे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली त्यांचे चिरंजीव विश्वजित यांना बाहेरचे कसे म्हणणार. अशी संकुचित मनोवृत्ती पुणेकर कधी दाखविणार नाहीत.