केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचे स्पष्टीकरण

अद्याप देशात पायाभूत सुविधांच्या निर्मितीची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी काही हजार कोटी रूपये खर्च करावे लागतात. ऑलिम्पिकच्या आयोजनावर एवढा निधी खर्च करण्यापेक्षा त्याचा वापर देशभरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी करण्यावर भर आहे. त्यामुळे तूर्तास भारतात ऑलिम्पिकच्या आयोजनाचा विचार नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग’ या विषयावर राठोड यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर एका विद्यार्थ्यांने ऑलिम्पिक आयोजनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला राठोड यांनी उत्तर दिले. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.

एनडीएतील शिक्षणापासून सैन्यातील सेवेपर्यंतच्या आठवणींना राठोड यांनी उजाळा दिला. ‘घटनेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्याच वेळी नागरिकांच्या जबाबदाऱ्याही नमूद केल्या आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे म्हणताना जबाबदाऱ्याही पाळल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी स्वतला सिद्ध करावे लागते हेच आजचे आव्हान आहे. त्यासाठी आपली पॅशन जपणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचे काही होणार नाही, अशी चर्चा केली जायची. मात्र, स्वतच्या अटींवर, तत्त्वावर जगणारी आजची पिढी तयार होत आहे. जवळपास २५ टक्के भारतीय समाजमाध्यमांमध्ये सक्रिय आहेत. या लोकसंख्येला एकत्र आणून चळवळ उभारणे शक्य आहे. त्या द्वारे देशात बदलाचे वारे आणता येतील,’ असे राठोड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राठोड यांनी स्पोर्ट्स सायन्ससाठी सुरू असलेले प्रयत्न, खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली.

डोळ्यासमोर निवडणूक!

राठोड जयपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. तुमच्यापैकी जयपूरचे कोण आहे असे राठोड यांनी विचारले असता तीन-चार विद्यार्थ्यांनी हात वर केले. लगेच राठोड यांनी ‘व्होट फॉर मी’ असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. तसेच त्यांनी ‘सबका साथ सबका विकास’ ही ओळ सर्वाच्या लक्षात असल्याचे सांगत पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना अशा योजनांद्वारे देश बदलत आहे. देशाला खूप वर्षांनी चांगले नेतृत्व मिळाले आहे, असेही सांगितले. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राठोड यांच्या डोळ्यासमोर मात्र आगामी लोकसभा निवडणूक असल्याचे दिसून आले.