राज्यातील शेतकर्‍यांना पीकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून यावर केंद्र आणि राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही. शिवसेनेने नुकतेच विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढले. याचे कारण काय, शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये झोपा काढतात का? अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली.

विम्याबाबत कृषीमंत्र्यांना किती पैसे मिळाले, बाजूच्या अधिकार्‍यांना किती मिळाले हे तपासायला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच विमा कंपन्या या लुटायला आल्या असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या राज्यातील दौर्‍याबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत करतो. पण या दौऱ्यातून तो सच्चा शिवसैनिक आहे का ते आता कळेल. एसीतून बाहेर पडून अंगाला माती लागली तरच तो खरा शिवसैनिक ठरेल असा उपहासात्मक टोलाही कडू यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.