पीएमपीचे तिकीटदर पाच रुपयात पाच किलोमीटर या प्रमाणे करावेत तसेच तिकीट आकारणीसाठीची टप्पा (स्टेज) पद्धत रद्द करावी, या स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या मागणीला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला असून या मागणीबाबत तातडीने निर्णय घेऊन पीएमपीने त्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे पत्र भाजपतर्फे देण्यात आले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पीएमपीच्या टप्पा पद्धतीमुळे एक ते दीड/दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या दहा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे जवळच्या अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून पाच किलोमीटपर्यंत पाच रुपये तिकीट असावे, अशी मागणी शहरातील सव्वीस स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन केली आहे. या मागणीला पाठिंबा देणारे पत्र भाजपतर्फे पीएमपीच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.
शहरवाहतुकीची तिकीट रचना प्रवाशांना गैरसोयीची ठरेल अशी नसावी. या दृष्टीने पीएमपीने किलोमीटरवर आधारलेली भाडे रचना करावी, असेही एक पत्र शिरोळे यांनी दिले आहे. अशा दरांमुळे सुटय़ा पैशांचा प्रश्न निर्माण होईल. मात्र त्यासाठी पीएमपीने कुपन पद्धत सुरू केल्यास तो प्रश्नही सुटू शकतो, असे शिरोळे म्हणाले. पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी डिझेलची बचत करणाऱ्या चालक, कामगारांना प्रोत्साहन भत्ता देणे, वायफळ खर्च कमी करणे, वेळापत्रकाची फेरचना करणे या उपायांची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी शिरोळे यांनी केली आहे.