राजकारण सोडायचे नाही, त्यातून निवृत्त व्हायचे नाही  म्हणूनच राष्ट्रपतीपद स्वीकारायचे नाही किंवा त्या स्पर्धेतही उतरायचे नाही असे ठरवले असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले. एखादा माणूस राष्ट्रपती झाला की तो राजकारणातून निवृत्त झाला असा अर्थ काढला जातो किंवा लोक तशी चर्चा सुरू करतात. मात्र मला कायम लोकांमध्ये राहण्यास आणि समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधण्यात रस आहे त्याचमुळे राष्ट्रपतीपद नको असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आज झालेल्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांचीही हजेरी होती. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही येणार होते मात्र ते येऊ शकले नाहीत. पवारांनी भाषण करण्याआधी जेव्हा सुशील कुमार शिंदे बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी शरद पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा केला, तसेच शरद पवारांकडे पाहिले. पवारांनी नकारार्थी मान हलवली. त्याचमुळे शरद पवार काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे होते. मात्र शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले.

आपल्या भाषणात शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांनाही कोपरखळ्या मारल्या. सुशीलकुमार शिंदे राज्यपाल झाले आणि त्यांनी परत निवडणूकही लढवली. अशी उडी मला काही जमणार नाही मी आपला आहे तिथेच बरा आहे. राष्ट्रपतीपदाचा रस्ता काही आपला नाही असे पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. तसेच शरद पवारांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

प्रतिभाताई पाटील या मुख्यमंत्री होऊ शकल्या असत्या मात्र त्यांची संधी मी हिरावून घेतली. १९८७ मध्ये राजीव गांधी यांचा फोन आला आणि मला त्यांनी दिल्लीत बोलावून घेतले. मी गेलो त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी प्रतिभाताईंऐवजी मला मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला सांगितली. काही गोष्टी घडायच्या असतात त्या तशा त्या त्या वेळी घडल्या असेही पवारांनी म्हटले. प्रतिभाताई या अत्यंत मृदू स्वभावाच्या नेत्या आहेत. त्यांचे काम खरोखर खूपच चांगले आहे असे म्हणत त्यांनी प्रतिभाताईंचे कौतुक केले.

शरद पवारांच्या भाषणातील मुख्यमंत्रीपदाचा धागा प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांच्या भाषणात बरोबर पकडला. मुख्यमंत्री होण्याची संधी तेव्हा हुकली.. पण मला पहिली महिला राष्ट्रपती होता आले याचाही आनंद आहे. राजकीय जीवनात मी खूप संघर्ष पाहिला. जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी माझे नाव सुचवले गेले तेव्हा देशातील राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळणे आवश्यक होते. शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे माझे लक्ष लागून होते. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या नावाला पाठिंबा दिला ही बाब मी कधीही विसरू शकत नाही असेही प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले. मी एक स्त्री म्हणून जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहे, प्रत्येक स्त्रीने तिच्या स्त्री असण्याचा अभिमान बाळगलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या.