‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) अर्थात उंची व वजनाच्या गुणोत्तराचे जागतिक स्तरावर ठरलेले मापदंड मान्य करुन आयएमएच्या पुणे शाखेने आपल्या सदस्यांना या मापदंडांचे पालन करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या ११ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि त्यातून उद्भवणाऱ्या इतर गुंतागुंती या आजारांचा जीवनशैलीशी जवळचा संबंध असून वजन आणि उंचीचे गुणोत्तर योग्य राखणे, हा या आजारांसाठीचा प्रतिबंधक उपाय ठरु शकतो, असे सांगून आयएमएच्या पुणे शाखेचे प्रवक्ता डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, ‘‘डॉक्टरांचा स्वत:चा बीएमआय योग्य असावा असे आवाहन संघटनेच्या सदस्यांना करण्यात येईल. त्यांना बीएमआयचे महत्त्व कळल्यावर ते त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना आणि रुग्णांमध्ये त्याचा प्रसार करतील. रुग्णाच्या प्रत्येक तपासणीच्या वेळी डॉक्टरने त्याचा बीएमआय देखील मोजावा आणि तो सामान्य आहे की नाही याबद्दल रुग्णाला मार्गदर्शन करावे, याचाही या संकल्पनेत समावेश आहे.’
माणसाच्या किलोग्रॅममधील वजनाला त्याच्या मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागल्यावर बीएमआयचा आकडा मिळतो. जागतिक स्तरावर बीएमआय १८.५ ते २५ या दरम्यान असेल तर तो योग्य समजला जातो. २५ ते ३० यात असलेल्या बीएमआयला ‘अति वजन’ असे म्हटले जाते, ३० ते ३५ मधील बीएमआयला ‘स्थूलता’, ३५ ते ४० ‘अति स्थूलता’ आणि ४० च्या पुढे ‘भयावह स्थूलता’ असे म्हटले जाते. काही शास्त्रज्ञांच्या मते बीएमआयचे योग्य मोजमाप १८ ते २३ असावे असेही मानले जाते, असेही डॉ. नवरंगे यांनी सांगितले.
पोटाचा घेर कमी करण्यातील तज्ज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन म्हणाले, ‘‘डॉक्टरांचा बीएमआय मापात असेल तर डॉक्टरांचे स्वत:चे आरोग्य चांगले राहीलच, पण ते रुग्णांनाही बीएमआय योग्य राखण्याबद्दल सल्ला देऊ शकतील. विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यासाठी बीएमआयच्या मापदंडांचे पालन करण्याचे आवाहन करायला हवे.’’