डॉक्टरांच्या सर्वेक्षणात पितळ उघडे पडण्याच्या भीतीने शहरातील १० ते १२ बोगस डॉक्टरांनी एका रात्रीत ‘दुकान’ बंद करून चक्क पोबारा केला आहे. हे सर्व ‘डॉक्टर’ शहरातील झोपडपट्टी वस्त्यांमध्ये ‘प्रॅक्टिस’ करत होते.
जानेवारीपासून पालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी, मुख्यत: झोपडपट्टी भागात डॉक्टरांचे सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात डॉक्टरांची ही निराळीच तऱ्हा पालिकेला पाहायला मिळाली. पालिकेचे कर्मचारी या सर्वेक्षणात डॉक्टरांच्या क्लिनिकवर जाऊन त्यांचे वैद्यक परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्राची मागणी करतात. संबंधित डॉक्टरकडे त्या वेळी ही प्रमाणपत्रे नसतील तर ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन तपासली जातात. १० ते १२ डॉक्टरांनी ‘प्रमाणपत्रे उद्या दाखवतो,’ असे सांगितले खरे, पण दुसऱ्या दिवशी पालिकेचे कर्मचारी तपासणीस गेल्यावर त्या ठिकाणी डॉक्टरचाच काय, पण त्याने लावलेल्या क्लिनिकच्या पाटय़ांचाही मागमूस नसल्याचे आढळून आले. या तथाकथित डॉक्टरांनी एका रात्रीत गाशा गुंडाळून चक्क पळ काढला होता.
पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत झोपडपट्टय़ांमधील डॉक्टरांचे सर्वेक्षण प्राधान्याने केले जात असून ते जवळपास पूर्ण झाले आहे. शहराच्या एका झोनमध्ये २ अन्न निरीक्षक व १ स्वच्छता निरीक्षक फिरून सर्वेक्षण करतात. एका दिवशी एका झोनमध्ये ३ ते ४ डॉक्टरांचे सर्वेक्षण केले जाते. डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये त्याची नोंदणी प्रमाणपत्रे दर्शनी भागात लावली नसतील तर त्यांची मागणी केली जाते. बरेचसे डॉक्टर नंतर प्रमाणपत्र दाखवतातही. पण १० ते १२ ठिकाणी संबंधित डॉक्टर एका रात्रीत पळून गेल्याचे आढळले.’’
गेल्या एका वर्षांत (ऑगस्ट २०१३ पासून) पालिकेने शहरातील ९ बोगस डॉक्टरांवर कारवाया केल्या आहेत. हे डॉक्टर प्रामुख्याने येरवडा व हडपसर भागातील असून त्या- त्या ठिकाणी बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशनद्वारे डॉक्टरांची बोगसगिरी शोधून काढण्यात आल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले. सदाशिव पेठ व डेक्कन परिसरातही प्रत्येकी एक बोगस डॉक्टर सापडला आहे.    
एखाद्या डॉक्टरच्या ‘डॉक्टर’ असण्याबद्दल शंका आल्यास पालिकेला कळवण्याबाबतच्या जाहिरातीही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जाहिरातींना मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नसून नागरिकांकडून आतापर्यंत केवळ ६ ते ७ तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.