गर्भवती महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉक्टर विरोधात  तक्रार दाखल केली आहे. पिंपरी येथील रुग्णालयात ही घटना घडली. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे. आरोप झालेल्या २८ वर्षीय डॉक्टरची नव्याने रुग्णालयात नियुक्ती झाली होती. तो मूळचा कर्नाटक धारवाडचा आहे. तक्रारदार महिला गृहिणी असून तिचा नवरा सुरक्षारक्षकाची नोकरी करतो.

तक्रारदार महिला चार महिन्यांची गर्भवती असून ती घरामध्ये पडली होती. आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका नको म्हणून तिला तात्काळ रुग्णालयात आणण्यात आले. वॉर्डच्या आतामध्ये तपासणी करताना डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला अशी माहिती पिंपरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हरीदास यांनी दिली.

महिलेच्या तक्रारीनुसार तिला रुग्णालयाच्या लेबर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली विनयभंग केल्याच्या आरोपावर महिला ठाम आहे. त्याचवेळी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी डॉक्टर आपले काम करताना रुग्णाला कुठला त्रास होणार नाही याची काळजी घेत होता. तपासणी सुरु असताना महिला कर्मचारी तिथे उपस्थित होत्या असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अजून डॉक्टरला अटक झालेली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.