हडपसरमधील एका अस्थिरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित डॉक्टरला करण्यात आलेली मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड या ताज्या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध डॉक्टर संघटनांनी बुधवारी मूक मोर्चा काढला.
दोन- तीन दिवसांपूर्वी हडपसरला घडलेल्या या प्रकारासारख्याच घटना नुकत्याच पनवेल, अहमदनगर आणि अहमदाबाद येथेही घडल्या आहेत. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी हडपसर डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे साऊथ डॉक्टर्स असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अशा १० ते १२ डॉक्टर संघटनांनी एकत्र येऊन हडपसर गाडीतळापासून हडपसर पोलीस चौकीपर्यंत मूक मोर्चा काढला. या मोर्चात ४०० ते ५०० डॉक्टर सहभागी होते.
आयएमएच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण हळबे म्हणाले, ‘‘रुग्णालयात रुग्ण दाखल झाला आणि त्याला लगेच बरे करुन दिले असे प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत होऊ शकत नाही. डॉक्टर हा देव नसतो.अशा प्रकरणांत नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून शासन व पोलिसांचेही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसते. डॉक्टरांविरोधात होणाऱ्या हिंसेबद्दलचा ‘व्हायोलन्स अ‍ॅक्ट’ २-३ वर्षांपूर्वीच झाला असून त्याच्या प्रती आम्ही सर्व पोलिस चौकींना पुरवल्या होत्या.’’