डॉक्टरांकडून रुग्णांना गरज नसताना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देण्याचे प्रमाण वाढत असून काही वेळा रुग्णही प्रतिजैविके देण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या ‘अँटिबायोटिक जनजागृती आठवडय़ा’च्या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापराबद्दल आपली निरीक्षणे नोंदवली.
वैद्यकीय व्यवसाय ‘कातडीबचाव’ झाला असून असुरक्षिततेच्या भावनेतून किंवा प्रतिजैविकांबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानातून रुग्णांना गरज नसतानाही प्रतिजैविके देण्याकडे डॉक्टरांचा कल दिसतो, असे डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘खरोखरच गरज असताना प्रतिजैविक द्यायलाच हवे, मात्र त्याची नेमकी गरज केव्हा आहे याबद्दलची प्रगल्भता आणि पुरेसे ज्ञान डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. रुग्णाला लवकर बरे वाटले नाही तर रुग्ण आपल्यावर नाराज होईल किंवा आपल्याविरुद्ध कोर्टात जाईल इथपर्यंतची भीती डॉक्टरांमध्ये असते. एखादा रुग्ण सर्दी-खोकला-ताप घेऊन आला तर दहापैकी नऊ रुग्णांमध्ये विषाणूजन्य संसर्ग आढळतो आणि विषाणूजन्य संसर्गासाठी प्रतिजैविकांची गरज नसते. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप असून त्यात जोपर्यंत गुंतागुंत होत नाही तोपर्यंत कोणतेही प्रतिजैविक देण्याची गरज भासत नाही. हा ताप सुमारे आठवडाभर टिकू शकतो. डॉक्टरांकडे जाऊनही दोन-तीन दिवसांत ताप बरा झाला नाही तर रुग्ण लगेच डॉक्टर बदलून पाहतात. अशा रुग्णांच्या बाबतीत प्रतिजैविकांविषयीच्या अपुऱ्या ज्ञानामुळे डॉक्टरांकडून प्रतिजैविके दिली जाण्याची शक्यता असते.’’
डॉक्टरांकडून होणाऱ्या प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापराला वैद्यकीय व्यवस्थेतील त्रुटी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे ‘साथी सेहत’ संस्थेचे डॉ. अरुण गद्रे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात अॅलोपॅथी डॉक्टरांचा तुटवडा असल्यामुळे ‘अॅलोपॅथी’चे आणि प्रतिजैविकांचे काहीही ज्ञान नसलेल्या बीएएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांकडून प्रतिजैविके दिली जातात. अॅलोपॅथीचे डॉक्टर देखील गरज नसताना प्रतिजैविके देतात. औषधनिर्माण क्षेत्राकडून कोणताही विधिनिषेध न ठेवता नवनवीन प्रतिजैविकांचे ‘मार्केटिंग’ केले जात असून डॉक्टर या मार्केटिंगला मोठय़ा संख्येने बळी पडत आहेत. दुसरीकडे रुग्णही सर्दी-खोकल्यासारख्या साध्या आजारांमध्येही बरे होण्याची वाट पाहू शकत नाहीत. प्रतिजैविके न देणाऱ्या डॉक्टरला फारसे काही कळत नसावे असा गैरसमज रुग्णांमध्येही तयार झाला आहे.’’
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे म्हणाले, ‘‘प्रतिजैविकांचा सर्रास वापर चुकीचा असून अॅलोपॅथीचे व प्रतिजैविकांचे ज्ञान नसलेल्या डॉक्टरांनी ती वापरू नयेत. अनेकदा विषाणूजन्य संसर्गात इतर ‘सुपरअॅडेड’ संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही प्रतिजैविके देतो, असे समर्थन डॉक्टर करतात, मात्र हे अशास्त्रीय आहे. खरी गरज असतानाच प्रतिजैविके द्यायला हवीत.’’
 
गरज नसताना प्रतिजैविके का ?
‘‘शरीरातील जंतूंना जेव्हा प्रतिजैविकांची ओळख झालेली नसते तेव्हा हे जंतू त्यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. मात्र गरज नसताना प्रतिजैविक दिले गेले किंवा ते जितक्या डोसमध्ये आवश्यक आहे तितका डोस दिला गेला नाही तर जंतूंना प्रतिजैविकाची ओळख होते आणि ते त्याला विरोध करायला शिकतात. त्यानंतर खरोखरच गरज असताना प्रतिजैविक दिल्यानंतर ते निरूपयोगी ठरण्याची शक्यता वाढते.’’
– डॉ. चंद्रशेखर फणसळकर