‘व्यवसायात अनेकजण मोठे होतात. डॉक्टरांनीही पैसा कमावणे चुकीचे नाही. मात्र त्याबरोबरच त्यांनी सामाजिक भान ठेवत संवेदनशीलता जपणेही गरजेचे असते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार मिळवणे हा उद्देश नसतो. मात्र, अशा व्यक्तींचा समाजापुढे आदर्श निर्माण करण्यासाठी पुरस्कारांची आवश्यकता असते,’ असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर वसंत प्रसादे, मधुकर ताम्हणकर, निरबहाद्दूर गुरूग, रामदास मोरे, अनिल लामखेडे, श्रीनिवास आचार्य या स्वातंत्र्यसेनांनींचाही सत्कार करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर, देवीसिंग शेखावत, यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी डॉ. शां. ब. मुजूमदार, प्रतापराव पवार, चंदू बोर्डे, सुधीर गाडगीळ आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘पुण्यात सगळेच विद्वान असतात. जगभरात कुठेही गेले तरीही वेगवेगळ्या क्षेत्रातील हुशार तरुण मला भेटतात. त्यातील बहुतेक पुण्यातील असतात. खरेतर एका विद्वान व्यक्तीने दुसऱ्या विद्वान व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणे ही दुर्मीळ गोष्ट असते मात्र ती देखील पुण्यात घडते, हेच पुण्याचे वैशिष्टय़ आहे. ज्या गावात आपण कार्य करतो त्या गावातील पुरस्कार मिळणे हे फार महत्त्वाचे असते. डॉ. संचेती यांचे कार्यही मोठे आणि या पुरस्काराची उंची वाढवणारे आहे.’ डॉ. संचेती म्हणाले, ‘पुणेकरांवर अनेक विनोद, टिप्पण्या होत असतात. पुणेकर चोखंदळ आहेत. मात्र एखादी गोष्ट चांगली आहे असे समजले तर त्याला प्रोत्साहन द्यायला किंवा त्याचे कौतुक करायलाही पुढे येतात. पुणेकरांनी मला खूप प्रेम दिले. त्याचबरोबर पत्नीने आणि घरच्यांनी साथ दिली म्हणूनच आजपर्यंत काम करू शकलो.’ देसाई यांनी प्रास्ताविक केले, सुरेश धर्मावत यांनी आभार मानले तर योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.