राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीचे कागद सामान्य नागरिकांना आता घरबसल्या विभागाच्या संगणकप्रणालीवर अपलोड करता येणार आहेत. याबरोबरच दस्त नोंदणीसाठी वेळही आरक्षित करता येणार आहे. विभागाकडून या सुविधा नव्यानेच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दस्त नोंदणीचे कागद अपलोड करण्याची (डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग) सुविधा सध्या केवळ मुंबईपुरतीच मर्यादित आहे. ही सुविधा आता राज्यभर सुरू करण्यात येणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून पब्लिक डाटा एण्ट्री (पीडीई) या संगणकप्रणालीमध्ये ई-स्टेप इन आणि डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग या दोन्ही सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदवायचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी ‘ई-स्टेप इन’ सुविधेसाठी वेगळ्या ठेवलेल्या वेळेत आपल्या सोयीची वेळ आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे रांगेत थांबण्याची आवश्यकता पडणार नाही. वेळेवर नोंदणीसाठी पोहोचल्यानंतर सेवा मिळणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

ई-स्टेप इन सुविधेनुसार वेळ आरक्षित करताना संबंधित दस्त नोंदणी कार्यालयाची वेळ, यापूर्वी आरक्षित केलेल्या वेळा आणि उपलब्ध वेळ दिसू शकेल. तर, डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये घरी बसून पक्षकार दस्त नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर भरू शकतील.

पीडीएफ वर्ल्ड फॉरमॅटमध्ये ही माहिती पक्षकाराने भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर दुय्यम निबंधक ही माहिती पडताळून पाहील. माहिती परिपूर्ण असल्यास ठरलेल्या वेळेत संबंधित नागरिक दस्त नोंदणी कार्यालयात येईल. भरलेल्या माहितीमध्ये काही शंका असल्यास संबंधित नागरिकाला निबंधक कार्यालयातून आगाऊ सूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे दस्त नोंदणीच्या वेळी शंका असलेले कागद घेऊन येण्यास अडचण येणार नाही.

दस्त नोंदणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांपैकी शेवटच्या पानावर स्वाक्षरी, अंगठय़ाचे ठसे घेतले जातील. तसेच परिशिष्टाचे कागद जोडले जातील. केवळ हेच दस्तऐवज सव्‍‌र्हरवर टाकले जातील. परिणामी, संबंधित व्यक्तीचा वेळ वाचणार असून विभागाच्या सव्‍‌र्हरवरील ताणही कमी होणार आहे. दस्तऐवज स्कॅन केल्याने मोठी जागा सव्‍‌र्हरवर लागते, ती वाचणार आहे. डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग ही सुविधा १ मार्चपासून मुंबईपुरतीच सुरू आहे.  ही सेवा आता राज्यात सर्वत्र सुरू करण्यात येणार असून त्याबाबतची कार्यवाही विभागाकडून केली जात आहे.

– अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य