शतक पार केलेली मराठी वाङ्मय क्षेत्रातील आद्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची वाटचाल माहितीपटातून उलगडणार आहे. साहित्य परिषदेची वास्तू, ललित-वैचारिक वाङ्मयाचे ग्रंथालय, ज्येष्ठ सारस्वतांचे परिषदेशी असलेले नाते आधुनिक दृक-श्राव्य माध्यमाद्वारे युवा पिढीला या माहितीपटाच्या माध्यमातून समजणार आहे.
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे यांच्या मनोगताचे चित्रीकरण करून बुधवारी या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. प्रा. रा. ग. जाधव यांच्या हस्ते या माहितीपटाच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. प्र. ल. गावडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, माजी नगरसेवक विजय काळे या वेळी उपस्थित होते.  यांनी या माहितीपटासाठी संहितालेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी पेलली आहे. ‘रोहन्स आय’ संस्थेने तांत्रिक सहकार्य देऊ केले आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून ज्या दिग्गजांनी संस्थेला ऊर्जितावस्थेमध्ये ठेवले अशा सर्वाना मानवंदना देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून परिषदेला मिळालेल्या ८२ लाख रुपयांच्या निधीच्या व्याजातून या माहितीपटाच्या निर्मितीसाठीची तरतूद करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्या वाङ्मयीन कार्याचा दृक-श्राव्य माध्यमातून मागोवा घेण्यासाठी एक तास कालावधीच्या माहितीपट निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. परिषदेच्या पुढील वर्षीच्या वर्धापनदिनापर्यंत हे काम पूर्ण करून दाखविण्याचा मानस आहे.
पुण्याचा चालता-बोलता इतिहास असा लौकिक असलेल्या म. श्री. दीक्षित यांनी सांगितलेल्या परिषदेच्या इतिहासाविषयीचे मनोगत गेल्या वर्षी चित्रित करण्यात आले होते. त्यासह आता या माहितीपटामध्ये डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. आनंद यादव या माजी संमेलनाध्यक्षांसह डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. न. म. जोशी, वसंत आबाजी डहाके, अॅड. भास्करराव आव्हाड, राजा फडणीस, उल्हास पवार यांची मनोगते चित्रित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शतक पार केलेली संस्था, टिळक रस्त्यावरील वास्तूची ऐंशी वर्षे आणि पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेले ग्रंथालय असा योग लाभलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याची वाटचाल माहितीपटातून उलगडत असल्याचा आनंद आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास हे परिषदेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. सातव्या खंडाच्या चार भागांच्या संपादनाचे काम करण्याची संधी लाभली हे भाग्य असल्याची भावना, प्रा. रा. ग. जाधव यांनी व्यक्त केली.