24 October 2020

News Flash

महिनाभरात ७९९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा!

कचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. कचराकुंडीत अनेकदा खाण्याचे पदार्थ टाकले जात असल्यामुळे त्या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळ्या तयार होतात.

| September 20, 2014 03:27 am

भटक्या कुत्र्यांचे चावे ही शहरात अगदी नित्याची गोष्ट झाली असून गेल्या आठ महिन्यात तब्बल ८ हजार ७३७ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्यांचा प्रसाद मिळाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा उपाय केला जात असला तरी त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्याचा परिणाम दिसणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे कुत्र्यांचे चावे कमी करण्यासाठी निर्बिजीकरणाचे प्रयत्न वाढवण्याबरोबरच कचराकुंडय़ांच्या व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात ६९० नागरिकांना कुत्रा चावल्याची नोंद आहे, तर ऑगस्टमध्ये कुत्रा चावलेल्या नागरिकांची संख्या ७९९ झाली आहे. पालिकेकडे येणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबतच्या तक्रारी प्रामुख्याने धनकवडी, बिबवेवाडी आणि येरवडय़ातून येत आहेत. उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘सप्टेंबर २०१३ ते ऑगस्ट २०१४ पर्यंत पालिकेने ९,६६९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. एका भागातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण केल्यानंतर एका वर्षांने पुन्हा त्याच भागातील कुत्र्यांना अँटिरेबीजचे लसीकरण करण्यास देखील आम्ही सुरुवात केली आहे.’’
कुत्रा चावण्याचे प्रसंग कमी करण्यासाठी कचरा व्यवस्थापन आवश्यक असून निर्बिजीकरणाचा परिणाम दिसून येण्यासाठी त्याची दिशा बदलणे गरजेचे असल्याचे मत ‘कुत्ता कन्सल्टंट्स’ या फर्मचे संचालक विक्रम होशिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘नर कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे तुलनेने सोपे असल्यामुळे प्रामुख्याने त्यांच्याच निर्बिजीकरणावर लक्ष केंद्रित केले जाते. एका भागातील नर कुत्र्यांचे निर्बिजीकरण केलेले असले तरी इतर भागातली निर्बिजीकरण न झालेली भटकी कुत्री त्या ठिकाणी येणे सहज शक्य असते. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत फारसा फरक पडत नाही. याउलट मादी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यावर भर दिला गेल्यास काही वर्षांनी कुत्र्यांच्या एकूण संख्येत फरक पडलेला दिसू शकेल. कचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. कचराकुंडीत अनेकदा खाण्याचे पदार्थ टाकले जात असल्यामुळे त्या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळ्या तयार होतात. त्या जागेच्या आसपास कुणी फिरकल्यास आपले खाणे हिसकावून घेतले जाण्याच्या भावनेने ही कुत्री माणसांना चावण्याची शक्यता असते.’’
पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. विनय गोऱ्हे म्हणाले, ‘‘कुत्र्यांच्या प्रजोत्पादनाच्या कालखंडात कुत्री आक्रमक होत असल्याचे दिसून येत असून त्यांच्या एकमेकांशी मारामाऱ्याही होण्याची शक्यता असते. कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असेल तर ती प्रजोत्पादन करू शकत नाहीत व त्यांचा आक्रमकपणाही कमी होतो. निर्बिजीकरणाचा योग्य परिणाम दिसून येण्यासाठी निर्बिजीकरण केले जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 3:27 am

Web Title: dog bite vaccination pmc
टॅग Pmc
Next Stories
1 शिक्षण मंडळाचे दूरध्वनी तोडले
2 अयोध्येमध्ये राम मंदिर होणारच- डॉ. सुब्रमण्यम स्वामी
3 वडिलांच्या फसवणुकीविरुद्ध मुलगाच जेव्हा उभा राहतो.!
Just Now!
X