कुत्रा हा इमानी प्राणी आहेच पण त्याचबरोबर माणसाचा सच्चा मित्रही आहे. कुत्र्याने संकटातून मालकाची सुटका केल्याची आतापर्यंत आपण अनेक उदहारणे पाहिली आहेत. पुण्यात रहाणाऱ्या डॉक्टर रमेश संचेती (६५) यांच्यासाठी त्यांनी संभाळलेला कुत्राच देवदूत बनला. ब्राऊनीने रमेश संचेती यांचे शेजारी अमित शाह यांना सतर्क केले नसते तर कदाचित रमेश संचेती आज या जगात नसते. पण ब्राऊनीने दाखवलेल्या हुशारीमुळे रमेश संचेती यांचे प्राण वाचले.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार २३ जानेवारीला बुधवारी रमेश संचेती यांना अंशत: पक्षघाताचा आणि मायनर ह्दय विकाराचा झटका आला. त्यादिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शाह यांनी ब्राऊनीला जेवण भरवण्यासाठी आणले होते. पण ब्राऊनी काही खात नव्हता. तो सतत संचेती यांच्या बेडरुमच्या खिडकीच्या दिशेने जात होता. काहीतरी चुकतय हे शाह यांच्या लक्षात आले.

शाह यांनी बेडरुमच्या खिडकीची फट होती त्यातून आता पाहिले तर संचेती हे जमिनीवर कोसळलेले होते. शाह यांनी लगेचच दरवाजा उघडला व संचेती यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. ब्राऊनी सतत त्याचे पुढचे पाय खिडकीला लावण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मला नेमकं तो काय करतोय ते लक्षात येत नव्हतं. जेव्हा मी पुढे जाऊन बघितलं तेव्हा डॉक्टर जमिनीवर पडलेले होते असे अमित शाह यांनी सांगितले.

घटनेच्यावेळी रमेश संचेती एकटेच घरात होते. त्याची पत्नी मुंबईला गेली होती. मुलगा पुण्याजवळच्या बावधन येथे तर मुलगी अमेरिकेत होती. संचेती आणि शाह १६ वर्षांपासून ब्राऊनीचा सांभाळ करत आहेत. ब्राऊनी पिल्लू असताना त्यांच्या सोसायटीत आले होते. आज ब्राऊनीमुळे डॉक्टर संचेती यांचे प्राण वाचले.