पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागात आणखी सात श्वान मृतावस्थेत आढळले असून एकूण १९ श्वानांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप हे कृत्य कोणी केले हे समजू शकलेले नाही. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते.

प्राणीप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोन श्वानांना पोत्यात टाकून नदीच्या कडेला नेत पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, यांच्यासह १२ श्वानांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज सकाळी मयत श्वान आढळलेल्या घटनस्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर पिंपळे गुरव सृष्टी चौक येथे आणखी सात भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत पिंपळे गुरव परिसरातील शिवनेरी कॉलनी आणि सृष्टी चौक येथे मयत श्वान आढळले आहेत.

धक्कादायक, पिंपरीत दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळलं, १२ श्वानांचा संशयस्पद मृत्यू

“अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानांना विष दिलं आहे की निष्काळजीपणे टाकलेल्या अन्नातून विषबाधा झाली याबाबत तपास सुरू आहे. आज सकाळी दीड किलोमीटर अंतरावर चार श्वानांचा मृत्यू झाल्याचं आढळलं आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिली आहे.