लोकबिरादरीतील वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी उपक्रम

कोथरुड येथील भारतीय विद्याभवन संस्थेचे परांजपे विद्यामंदिर.. पटांगणावर अंथरलेले ‘रेड कार्पेट’ आणि त्यावर मोठय़ा थाटात ‘एन्ट्री’ करणारे देशी विदेशी जातींचे पाळीव कुत्रे, त्यांच्याबरोबर जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रिव्हर, पग, लॅब्रेडोर, सेंट बर्नार्ड अशा विविध जातींचे फॅशनेबल कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज घातलेले कुत्रे आणि त्यांच्याशी खेळता खेळता हरखून गेलेले आबालवृद्ध.. हे चित्र होते लोकबिरादरी मित्र मंडळातर्फे आयोजित ‘फन फेअर विथ पॉज अ‍ॅण्ड टेल्स’ या पाळीव प्राण्यांच्या गंमतजत्रेचे!

हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी लोकबिरादरी मित्र मंडळातर्फे ‘फन फेअर विथ पॉज अ‍ॅण्ड टेल्स’ या गंमतजत्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या जत्रेचे तिसरे वर्ष होते. भारतीय विद्या भवनचे नंदकुमार काकिर्डे, लोकबिरादरी मित्र मंडळाचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी आणि अनेक स्वयंसेवक या गंमतजत्रेसाठी उपस्थित होते.

योगेश कुलकर्णी म्हणाले,की गेली ४४ वर्षे डॉ. प्रकाश आमटे वन्यप्राण्यांसाठी समर्पणाच्या भावनेतून काम करतात. अनाथ आणि जखमी प्राण्यांसाठी ते करत असलेल्या कार्याला आर्थिक मदत उभी करण्याच्या हेतूने या गंमतजत्रेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या उपक्रमातून जमणारी सर्व रक्कम हेमलकसा येथील प्राण्यांच्या खाद्य आणि औषधोपचारांसाठी वापरली जाणार आहे. तब्बल ६८ श्वान आणि त्यांच्या पालकांनी या गंमतजत्रेत सहभाग घेतला. कुत्र्यांसाठी आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रॅम्पवॉक, अडथळ्यांची शर्यत, वाटीखाली लपविलेला पदार्थ शोधणे अशा अनेक गमतीशीर उपक्रमांमुळे या कार्यक्रमाला खरेच एखाद्या जत्रेचे स्वरुप आले होते.