पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड शहरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करू या, त्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पिंपरीत एका बैठकीत बोलताना केले. वर्गणीसाठी कोणावरही सक्ती करू नका, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली.

पिंपरी पालिका व पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली, त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते झाले. महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत िशदे, पोलीस उपायुक्त गणेश िशदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते.

रश्मी शुक्ला म्हणाल्या, गणेशाला विघ्ननाशक म्हणतात. हा गणेशोत्सव वैदिक पद्धतीने साजरा करावा. मंडळांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवाना देण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश पाळून पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. आयुक्त हर्डीकर म्हणाले, पर्यावरणपूरक उत्सव करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. परवान्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच, शुल्क कमी करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस उपायुक्त गणेश िशदे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. राम मांडुरके यांनी आभार मानले.

मंडळांच्या सूचना

गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व ते परवाने एकाच ठिकाणी देण्यात यावेत, रस्त्यांवरील खड्डय़ांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, विसर्जनाच्या दिवशी हौदांची संख्या वाढवावी, निर्माल्य टाकण्यासाठी घाटांवर मोठय़ा प्रमाणात कलशांची व्यवस्था करावी, ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. सीसीटीव्हीची संख्या वाढवावी, पोलिसांची कुमक वाढवावी, यांसारख्या सूचना मंडळांच्या वतीने बैठकीत करण्यात आल्या.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नागरिक देतील तशी ऐच्छिक वर्गणी स्वीकारावी. उत्सव काळात वातावरण प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गणेश मंडळांचे परवाना शुल्क कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

नितीन काळजे, महापौर, पिंपरी