एकेकाळी हॉटेलमध्ये खाणे निषिद्ध मानले जात होते, अशा पुण्यात आणि तेही सदाशिव पेठेमध्ये सुरू झालेल्या ‘पूना बोर्डिग हाऊस’च्या घरगुती भोजन सेवेने नऊ दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. सोवळ्यामध्ये केलेला स्वयंपाक, पाटावर बसून जेवण करणे येथपासून, ते आता नव्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या बोर्डिंगमध्ये टेबल-खुर्चीवर बसून घेतलेला आस्वाद अशी पूना बोर्डिगची वाटचाल झाली आहे. परगावच्या विद्यार्थ्यांना भोजनाची सोय व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेले बोर्डिगचे जेवण ही पुणेकरांची आता गरज होऊन गेली आहे. हॉटेलची साखळी व्यवसाय असलेल्या ‘कामत हॉटेल’चे विठ्ठल कामत यांनीही अगदी दोनच दिवसांपूर्वी या भोजनाचा स्वाद चाखला आहे.
नऊ दशकांपूर्वी ५ नोव्हेंबर १९२५ रोजी पूना बोर्डिग हाऊसची स्थापना झाली. तो दिवस होता दिवाळीचा पाडवा. मूळचे कर्नाटकातील उडपी या गावचे रहिवासी गुरुराज रामकृष्ण ऊर्फ मणीअप्पा उडपीकर यांनी या खानावळीची स्थापना केली. जुन्या पिढीतील लोकांसाठी अजूनही ही मणीअप्पांची खानावळ आहे. ही खानावळ सुरू केली तेव्हा दोन वेळच्या पोटभर जेवणाचा दर अवघे १२ रुपये होता. अर्थात हे १२ रुपयेही जड असण्याचाच तो काळ होता. मणीअप्पांचे चिरंजीव रामकृष्ण गुरुराज ऊर्फ अण्णा उडपीकर आणि नातू सुहास अशा तीन पिढय़ा रास्त दरामध्ये पुणेकरांची क्षुधा भागविण्याचे काम पूना बोर्डिग हाऊसच्या माध्यमातून होत आहे.
स. प. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दहा वर्षांनी पूना बोर्डिग सुरू झाले. बाहेरगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय म्हणून मणीअप्पांनी सदाशिव पेठेतील आवटे वाडय़ामध्ये खानावळ सुरू केली. १९६२ च्या पानशेत पुरानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलला. दोनच वर्षांनी किलरेस्कर कमिन्स सुरू झाले. टेल्को, बजाज ऑटो, सेन्चुरी एन्का, सँडविक एशिया अशा कंपन्या सुरू झाल्यानंतर पुण्यामध्ये स्थलांतरितांची संख्या वाढली. पुण्यात राहून नोकरी करणाऱ्या लोकांना भोजनासाठी पूना बोर्डिग मध्यवर्ती होते. अगदी िपपरी-चिंचवडपर्यंत भोजनाचे डबे जात होते. काळाची गरज ओळखून खानावळीमध्ये टेबल-खुच्र्या आणण्यात आल्या. जेवणासाठी थांबण्याचा कालावधी दीड-दोन तास झाला, त्यानंतर आवटे वाडय़ाशेजारी बांधकाम सुरू झालेल्या इमारतीमध्ये पूना बोर्डिग हाऊस स्थलांतरित झाले. पूर्वी बाहेर जेवणे हे जणू पाप मानले जायचे. मात्र, आता नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी पूना बोर्डिगचे भोजन ही गरज झाली असल्याचे सुहास उडपीकर यांनी सांगितले.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, तुळशीदास बोरकर, नाना पाटेकर, श्रीकांत मोघे यांच्यासारख्या दिग्गजांनी पाटावर बसून जेवण केले आहे. २८ एप्रिल १९७७ रोजी मी या व्यवसायामध्ये आलो तेव्हा जेवणाच्या थाळीचा दर दोन रुपये होता. चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असतानाच्या काळात ‘आऊटडोअर केटिरग’ सुरू केले. आता काळाची गरज ओळखून ‘भोजन पार्सल’ची सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही सुहास उडपीकर यांनी सांगितले. दंतवैद्यक झालेला मुलगा राजस आणि कन्या ऋतुजा हे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी मला मदत करण्यासाठी येत असल्याचा आनंद वाटतो. पुण्याचे पुणेरीपण जपल्याबद्दल पूना बोर्डिग हाऊसचा ‘दिवाळी पहाट पुण्यभूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.