मूळचे परदेशी बनावटीचे आणि चर्चमध्ये प्रार्थनेच्यावेळी वाजविले जाणारे.. वसाहतवादी राजवटीत भारतामध्ये आलेले.. नटसम्राट बालगंधर्व, गायनाचार्य भास्करबुवा बखले आणि गाेविंदराव टेंबे या जाणकारांनी संगीत नाटकांमध्ये वापर करून लोकप्रिय केलेले.. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये उत्पादन बंद झाल्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातून गेलेले ‘ऑर्गन’ हे वाद्य काळाच्या ओघात लुप्त होते की काय अशी चिंता असतानाच कोकणातील आडिवरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे निर्मिला गेलेला संपूर्ण स्वदेशी बनावटीचा ऑर्गन आता परदेशामध्ये जात आहे.
राजापूर तालुक्यामध्ये संगीत शिक्षक असलेल्या उमाशंकर ऊर्फ बाळा दाते यांनी दहा वर्षे संशोधन करून या ऑर्गनची निर्मिती केली आहे. एकेकाळी परदेशातून भारतामध्ये आलेले हे वाद्य आता भारतातून अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये जात आहे. प्रसिद्ध संवादिनीवादक आदित्य ओक यांच्या परिचयातून डेव्हिड रस्टेज यांनी आपल्याशी संपर्क साधला असून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानंतर ते आडिवरे येथे भेट देणार आहेत. त्यांनी फोल्डिंग ऑर्गनची मागणी केली असल्याची माहिती उमाशंकर दाते यांनी दिली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये बाळा ऑर्गन अँड म्युझिकल्सच्या स्टॉलवर हे ऑर्गन पाहावयास मिळतील. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या स्वदेशी बनावटीच्या ऑर्गनचा प्रसार करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिल्याचेही दाते यांनी सांगितले.
दाते म्हणाले,‘‘अप्रतिम गोडवा आणि भारदस्त आवाजामुळे ऑर्गन भारतामध्ये लोकप्रिय झाले. मात्र, दुरुस्तीविना कित्येकांचे हे वाद्य अडगळीत जाऊन पडले होते. या वाद्याचा अभ्यास करून मी ऑर्गनची निर्मिती आणि दुरुस्ती शिकलो. सध्या मला ऑर्गनच्या निर्मितीसाठी परदेशातून ‘रीड्स’ मागवावे लागतात. मात्र, धातूशास्त्राच्या मदतीने संपूर्ण भारतीय बनावटीच्या रीड्सनिर्मितीसाठी संशोधन सुरू आहे. तबलावादक प्रसाद करंबळेकर यांच्यासाठी २०१३ मध्ये मी ऑर्गनची निर्मिती केली होती. संवादिनीवादक आदित्य ओक, राहुल गोळे, गायक भरत बलवल्ली यांनी माझ्याकडून ऑर्गन खरेदी केला आहे. परदेशामध्ये कार्यक्रम करताना ३५ किलो वजनाचा ऑर्गन विमानातून नेणे अवघड असल्याची बाब आदित्य ओक यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मी ऑर्गनचे वजन निम्म्याने कमी केले. आता १८ किलो वजनाचा घडी करून (फोल्डिंग) नेता येऊ शकेल अशा ऑर्गनची निर्मिती केली आहे. बहुतांश संवादिनीवादकांनी माझ्याकडून ऑर्गन घेतला आहे.
ऑर्गनचे मूळ फ्रान्समधील. १८१० मध्ये दाब तत्त्वावर वाजणारा ऑर्गन निर्मिला गेला. त्यानंतर १८३५ मध्ये सक्शन पद्धतीचा ऑर्गन बनविण्यात आला. अमेरिकेत या वाद्याच्या तंत्रज्ञानात संशोधन होऊन रीड्स पद्धतीचा ऑर्गन झाला. ऑर्गनमध्ये पाय मारल्यानंतर आत निर्वात पोकळी तयार होते आणि सूर दाबल्यानंतर रीड्समधून हवा आत जाऊन नादमधुर स्वरनिर्मिती होते. सिंथेसायझरच्या आगमनानंतर आता परदेशातील ऑर्गन निर्मिती कंपन्या बंद पडल्याने हे वाद्यदेखील लुप्त होत आहे. बंद पडलेल्या ऑगर्नची रीड्स मागवून ते स्वदेशी बनावटीच्या ऑर्गनमध्ये वापरले जात आहे, असेही दाते यांनी सांगितले.