सामाजिक संस्थांना ५० लाख रुपयांची देणगी प्रदान करून महाराष्ट्र राज्य नगरविकास संचालनालयाच्या माजी सहसंचालिका आशा जावडेकर यांच्या अंतिम इच्छेची रविवारी पूर्ती करण्यात आली. निधनानंतरही सामाजिक कार्याला मदत करण्याची दानशूर व्यक्तीची तळमळ यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवली.
नागरी अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी संपादन करणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला पदवीधर असलेल्या आशा जावडेकर यांच्या अंतिम इच्छेनुसार साकार (श्री अरिबंदो सेंटर फॉर अॅडव्हान्स रिसर्च), स्नेहांकित, श्वेता, हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्ड आणि वंचित विकास या संस्थांना त्यांची संपत्ती दान करण्यात आली. साकार संस्थेचे डॉ. आनंद रेड्डी, स्नेहांकितचे संचालक राहुल देशमुख, श्वेताच्या संचालिका डॉ. माया तुळपुळे, हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्डच्या नसीमा हुरजूक आणि वंचित विकास संस्थेचे विलास चाफेकर यांच्यासह आशा जावडेकर यांचे बंधू विलास जावडेकर, विश्वास जावडेकर, सुनंदा जोशी, रवींद्र सुर्वे या वेळी उपस्थित होते.
दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणारी माणसे समाजामध्ये खूप कमी आहेत. आशाताई त्यापैकी एक होत्या. आपल्या आजूबाजूला पैसे असणारी श्रीमंत माणसे बरीच असतात. पण, मनाची श्रीमंती दाखवत दुसऱ्यांना मदत करणारी कमी असतात. मनाने श्रीमंत असलेल्या आशाताईंनी आपली संपत्ती दान करून वस्तुपाठ निर्माण केला असल्याचे राहुल देशमुख यांनी सांगितले.