पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त गुरुवारपासून जेजुरी येथे पारंपरिक गाढव बाजार भरला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच गुजरातमधील काठेवाड, सौराष्ट्र, भावनगर, अमरेली, राजकोट आदी भागातून सुमारे दीड हजार गाढवे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. चार दिवसांमध्ये गाढव खरेदी-विक्रीतून यंदा दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे.
या बाजारासाठी गाढवांचे कळप घेऊन व्यापारी येण्यास दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ग्रामीण भागात गाढव हे आजही उपयुक्त जनावर म्हणून ओळखले जाते. उंच डोंगरावर, अडचणीच्या ठिकाणी, खोल डोंगर-दऱ्यांमध्ये, दुर्गम भागात माती, दगड, खडी, मुरुम व इतर वाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो.
यंदाच्या बाजारात गावठी गाढवांची किंमत सात हजारांपासून पंधरा हजार रुपये तर काठेवाडी गाढवांची किंमत दहा ते तीस हजारांपर्यंत आहे. एखादे वाहन खरेदी करताना जशा विविध चाचण्या घेऊन व्यवहार केला जातो, तशाच पद्धतीने अनेक कसोटय़ा लावूनच गाढवांची खरेदी केली जाते. खरेदीसाठी आलेले व्यापारी गाढवांचे दात पाहून किंमत सांगतात. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढवांना घेऊन येणारे व्यापारी त्यांच्या अंगावर विविध रंगाचे आकर्षक पट्टे ओढून त्यांना सजवतात. सध्या वीट भट्टय़ांचे व्यवसाय तेजीत असल्याने गाढवांची मोठय़ा प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे या बाजारात चांगली उलाढाल होत आहे.
प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने सोलापूर येथील द डॉन्की सॅन्चुरी इंडिया या संस्थेच्या वतीने मोफत उपचार केले जातात. संस्थेतर्फे मालकांना गाढवांचे संगोपन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सत्यजीत पाटील, डॉ. नामदेव बेनके तसेच आयुब शेख, सुभाष गायकवाड यांनी जखमी व आजारी गाढवांवर उपचार केले. गाई-बलांप्रमाणेच गाढवांची काळजी घ्यावी लागते. त्यांना दरवर्षी धनुर्वात, रेबीज आदी लसी द्याव्या लागतात, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
बाजार होतोय आधुनिक
पूर्वी अनेक व्यापारी दोन ते तीन महिने प्रवास करून गाढवांचे कळप विक्रीसाठी जेजुरीत आणायचे. परंतु आता वाहनांच्या सोई झाल्याने बहुतेक व्यापारी वाहनांचाच वापर करीत आहेत. तसेच बहुतेक व्यापाऱ्यांकडे स्मार्ट फोन असून ते सोशल मिडीयाचाही वापर करत असल्याचे दिसले. अनेक तरुणही या व्यापारात उतरल्याचे जुन्नरच्या सारंग नागरे या तरुणाने सांगितले.