उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्य़ातील जनतेला मिळण्यासाठी आंदोलन करून काही उपयोग होत नाही. त्यामुळे सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी मुंबईत आझाद मैदानावर ‘गाढवाचं लग्न’ लावण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांनी शनिवारी सांगितले. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळेच ही पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोक भारती पक्षातर्फे आयोजित दुष्काळ निर्मूलन परिषदेमध्ये देशमुख बोलत होते. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, एच. एम. देसरडा, चेतन पंडित, अॅड. वर्षां देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, संपतराव पवार, प्रदीप पुरंदरे, गणपतराव आवटी, लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, आदिनाथ िशदे, सुरेश देशमुख या प्रसंगी उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, उजनीतील पाणी मिळावे यासाठी आझाद मैदानावर गेल्या ११७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. टाळ-मृंदगाचा गजर करीत हा काळा विठ्ठल गोऱ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी वर्षां बंगल्यावर गेला होता. महिलांचा घागर मोर्चा, आत्मदहनाचा इशारा याचा मुख्यमंत्र्यांवर फरक पडला नाही. गाढवाचं लग्न लावल्यावर पाऊस पडतो ही जुनी श्रद्धा असल्याने पाच जून रोजी आझाद मैदानावर हा विवाह होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रेषक असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागतोत्सुक आहेत. पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे कार्यवाहक असून सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व आमदार छोटे निमंत्रक आहेत. आहेर म्हणून केवळ पाणी स्वीकारले जाईल.
लोकशाहीवर निष्ठा आणि विज्ञाननिष्ठा यातून दुष्काळ निर्मूलन होऊ शकेल, असे डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले. विज्ञान आणि लोकशाही दडपून विपर्यस्त माहिती देण्याचे काम सरकार करीत आहे. बांधली जाणारी धरणे वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य आहेत का, याचा विचार होत नाही. जितकी धरणे बांधू तेवढे बाष्पीभवन वाढेल आणि शेतक ऱ्यांना पाणी मिळणार नाही असा युक्तिवाद केला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.