एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी आपल्या बरोबर राहणार नाही, कधीही सोडून जाऊ शकते, त्यामुळे स्वबळावर निवडून येता येईल, असे काम करा, असे थेट विधान उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी लोणावळ्यात केले. भाजप-सेना-मनसे विरोधात आहेत, त्यांना आपले सरकार पाडायचेच आहे, असे सांगून नरेंद्र मोदींची चिंता करू नका, त्यांचा प्रचारकाळात बाहेरच समाचार घेऊ, असेही ते म्हणाले.
प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप राणेंच्या उपस्थितीत झाला, तेव्हा ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, केंद्रीय पदाधिकारी चारूलता टोकस, पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते कैलास कदम, महिलाध्यक्षा ज्योती भारती आदी उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनासाठी आपल्याला का बोलावले नाही, ते माहीत नाही. माझ्या राशीला समारोपच का येतो, ते कळत नाही, अशी गमतीदार टिपणी राणेंनी या वेळी केली.
राणे म्हणाले, लोकसभेत जास्त जागा आल्या, तरच विधानसभेतील संख्याबळ वाढणार आहे. आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद महिलेला मिळणे शक्य आहे. अनेक राज्यात महिला मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यातील चांगल्या गुणांचा स्वीकार करा. निष्ठेने काम करणाऱ्या महिलांवर अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशिवाय पक्ष मोठा होत नाही. घराणेशाही नसताना राजकारणात यशस्वी ठरलो. सात वेळा निवडणुकाजिंकलो. युती काळात माझ्याकडे ८-१० खाती होती. मनोहर जोशींना काढल्यानंतर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यासाठी कोणाकडे जायची वेळ आली नाही. आपल्यातील चांगल्या गुणांचा वापर पक्षवाढीसाठी करा आणि दुर्गुण असेल, तर विरोधकांसाठी वापरा. विरोधक फक्त  टीका करतात, गरिबांसाठी ते काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले.
हत्या निंदनीय
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या निंदनीय आहे. महाराष्ट्रात असे कृत्य व्हायला नको होते. आपण सर्वत्र निर्भय वातावरणाचा दिंडोरा पिटतो. अशा पद्धतीने एका चांगल्या कार्यकर्त्यांची हत्या होणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी व्यक्त केली.