देशभरात सध्या लोकसभा निवडणुका होत असून राजकीय नेत्याकडून पुलवामावरुन मते मागणे चुकीचे आहे. सैन्याचा राजकीय वापर करु नये, अशी मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मांडले आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले की, जर त्यांना कोणी प्रश्न विचारत असेल. तर त्यांना उत्तर द्यावी लागणारच आहेत. पाऊस पडला नाही. उष्णतेची लाट आली. तर सरकार कसे जबाबदार ,सरकार काही ढग आडवत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे खापर सरकारवर फोडणे चूकीचे असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाना साधला.

राजकीय क्षेत्रात अभिनेते प्रवेश करीत आहेत. राजकारणात देखील प्रशिक्षणाची गरज आहे का? या प्रश्नावर विक्रम गोखले म्हणाले की, राजकारणासाठी प्रशिक्षण गरज असून अमिताभ बच्चन यांनी देखील काही काळ राजकारणात घालवला आहे. याबाबत त्यांना काही काळानंतर पश्चाताप झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे म्हणाले की, मला ही अनेक राजकीय पक्षांनी बोलवले. पण मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नसून मी सैन्य, शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकाला कायम बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनय क्षेत्रात एवढी वर्ष काम केल्यावर आता तुम्ही आत्मचरित्र लिहणार का त्यावर ते म्हणाले की, मी आत्मचरित्र लिहणार नसून सर्व आत्मचरित्र खोटी असतात. मी फालतू आहे. त्यामुळे आत्मचरित्र लिहणार नाही. मी एवढा मोठा नाही. माझ्यापेक्षा अनेक मोठे व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.