ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल, असे विधान करुन राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या अडचणीत भर टाकली आहे. घरपोच दारू नको पण घरपोच पाणी द्या अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाळ वाजवून दारू नको पाणी द्या असं आंदोलन केलं. यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

राज्य सरकार ऑनलाइन दारू विक्रीतून व्यसनाधीनता वाढवत आहे, दारूची ऑनलाइन विक्री होता कामा नये. या सरकारला लवकर सुबुद्धी मिळूदे, अशी प्रार्थना देवाकडे आहे. त्यामुळे टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे, घरपोच ऑनलाइन दारू पोहचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घरपोच दारूच्या बाटल्या पोहचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहचवा, असे म्हणत राज्य सरकारला त्यांनी सुनावले आहे. दरम्यान, घरपोच दारुची सुविधा देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.