आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून निश्चित विजय होतील या भ्रमात राहून कार्यकर्त्यांनी प्रचारात खंड पाडू नये, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आचारसंहितेचेही काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आरंभ कन्हेरी येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. ‘महायुतीने माढय़ातील उमेदवार बारामतीला लादला आहे. यंदाची निवडणूक वेगळी आहे. देशात आणि राज्यात कितीही राजकीय स्थित्यंतरे झाली किंवा लाट असो किंवा नसो मात्र बारामतीचा मतदार शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवारालाच मतदान करतो हा आजवरचा इतिहास आहे. बारामती मतदारसंघाच्या विकासासाठीच सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आहे,’ असे अजित पवार म्हणाले.
कोणत्याही पक्षाने संधी दिल्यानंतर उमेदवार निवडून गेल्यावर त्यांनी मतदारसंघात विकासकामे केली तरच मतदार व समाज त्या उमेदवाराच्या पाठिशी राहतोच. बारामती-पुणे नवीन रल्वे मार्ग जिरायत भागातून काढण्यात आला आहे याचा फायदा अनेकांना होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
या वेळी आव्हाड म्हणाले की, जातपात, धर्म न बघता केवळ कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या शरद पवार यांच्यामुळेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदापर्यंत पोहोचलो आहे. विरोधकांनी बारामती या मतदारसंघाबद्दल न बोललेले बरे. महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना भाजपने गुजरात सरकारकडे मदत मागितली होती. मात्र, मोदी सरकारने अत्यल्प मदत केली. मात्र, गुजरातमध्ये भूकंप झालेला असताना महाराष्ट्र अघाडी सरकारने मोठी मदत केली. शरद पवार यांच्यामुळे देशातील गोरगरीब जनतेला अन्न मिळत आहे.
बळीराजा सुखी आहे त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला भाव आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना देशाचा इतिहास माहिती नाही. ते देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचा भूगोल बदलून टाकतील.
श्रीमती सुळे म्हणाल्या की, केंद्रात भाजपचे सरकार असताना महाराष्ट्रासाठी दुष्काळग्रस्तांना दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली तेव्हा त्यांनी पंचावन्न कोटी देऊ केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत एकमत असल्यामुळे राज्यातील ४८ जागांपैकी आघाडीला किमान ३८ जागा निश्चितच मिळतील असा आशावाद पतंगराव कदम यांनी व्यक्त केला आहे.
 अशोक इंगुले, देविदास भन्साळी यांचीही या वेळी भाषणे झाली.