करोना व्हायरसचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपल्यापरीतने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पुणे जिल्ह्यातील करोना व्हायरसने बाधित असलेले रुग्ण आणि स्थितीबाबत दररोज सरकारी पातळीवरुन माहिती दिली जात आहे. पण काही मोजकी प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियामधून करोना बाधित रुग्णांची संख्या, मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या, करोना संशयित रुग्ण, विषाणूचा प्रादूर्भाव झालेला परिसर याबद्दल कोणतीही खातरजमा न करता बातमी प्रसारित करण्याची चढाओढ सुरु आहे.

त्यामुळे समाजात अकारण भिती निर्माण होत आहे. पुणे पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. कोणतीही बातमी खातरजमा न करता प्रसारीत करणे हा प्रचलित कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी दंड व कारवासा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

प्रसारमाध्यमं व सोशल मीडियातील ग्रुप अ‍ॅडमिननी अशी कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी अशा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे. पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी तसे पत्रकच प्रसिद्ध केलं आहे.