ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अपंगांना ई-सेवा केंद्रात येण्याचा सल्ला

आधार केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग (शारीरिकदृष्टय़ा विकलांग), रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्यक्ष घरी येऊन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची कामे करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी अर्जही केले. सुरुवातीला काही ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचा लाभही देण्यात आला. परंतु, अर्जाची वाढती संख्या पाहता अर्जदारांचे पत्ते शोधणे, प्रवासाचा वेळ आणि विहित वेळेत कामे होणार नसल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांगांना घराजवळील महा ई सेवा केंद्रात जाऊन आधारची कामे करून घेण्याबाबतचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या निमित्ताने घरपोच आधार सेवेचा उलटा प्रवास समोर आला आहे.

ज्या ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि अपंगांना आधार नोंदणीसाठी महा ई सेवा केंद्र किंवा आधार नोंदणी केंद्रांमध्ये पायी चालत जाणे शक्य नाही. त्यांच्यासाठी सशुल्क घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता शासनाच्या नियमानुसार चारशे रुपये शुल्क आकारले जाते. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कार्यालयीन वेळेनंतर प्रत्यक्ष घरी जाऊन कामे केली जात आहेत. मात्र, आता घरी जाऊन कामे करण्यासाठी चार विशेष यंत्रांची सोय करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी १९ डिसेंबरला जाहीर केले होते.

घरपोच आधार सेवेसाठी आतापर्यंत पाचशे अर्ज आले आहेत. त्यामुळे या सर्वाना सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक महा ई सेवा केंद्रांची मदत घेतली जाणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत १०८ जणांनी अर्ज केले होते. त्यांपैकी अठरा नागरिकांना घरपोच सेवेचा लाभही देण्यात आला आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टपाल विभागात २५० अर्ज, तर विशिष्ट ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय), आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन २५० असे एकूण पाचशे अर्ज आले आहेत. या सर्वाना घरपोच सेवा ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

घरपोच सेवेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांचे पत्ते शोधणे, आधारनोंदणी व प्रवासाचा वेळ पाहता पाचशे अर्जापैकी सर्वानाच सेवा पुरवता येणे अशक्य आहे. त्याकरिता शहर आणि उपनगरातील स्थानिक महा ई सेवा केंद्रांची मदत घेतली जाणार आहे. त्याकरिता महा ई सेवा केंद्रांना उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या घराशेजारील महा ई सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध वेळेनुसार प्राधान्य देऊन आधार नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती आधारचे मुख्य समन्वयक अधिकारी, तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.

९३.०७ टक्के आधार नोंदणी

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात ९३.०७ टक्के आधार नोंदणी झाली आहे. उर्वरित ८ टक्के आधारनोंदणीचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्याकरिता अतिरिक्त यंत्रे, खासगी यंत्रचालक तैनात करण्यात येणार आहेत.