पुण्यातील अभिनव उपक्रम; पाळीव प्राण्यांची गैरसोय टळली

पुणे : एखाद्या कुटुंबात करोना रुग्ण आढळल्यास किंवा घरातील सदस्य विलगीकरणात गेल्यास त्या कुटुंबातील पाळीव प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न करोना काळात प्रकर्षाने उभा राहतो. करोनाबाधितांच्या घरातील श्वान आणि मांजरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाळीव प्राण्यांचे वसतिगृह उभारण्याची कल्पना पुण्यात राबविण्यात आली आहे.

डी. पी. रस्ता येथील महालक्ष्मी लॉन्सजवळ  ‘द डॉग हाऊस’ नावाचे प्राण्यांचे वसतिगृह चार वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र करोना रुग्णवाढीमुळे कित्येक घरांतील पाळीव प्राण्यांकडे दुर्लक्ष व्हायला लागले. औषधोपचारांसाठी रुग्णालयांत दाखल झालेल्या घरातील सदस्यांमुळे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा आहार आणि विहार यांवर बंधने आली. अशा घरांतील प्राण्यांना योग्य सुविधा मिळावी यासाठी ‘द डॉग हाऊस’च्या पूजा गायकवाड यांनी प्रयत्न सुरू केले. गेल्या पंधरा वर्षांपासून त्या ‘डॉग ग्रुमिंग’ क्षेत्रात कार्यरत आहेत.  कामानिमित्ताने किंवा कौटुंबिक सहल, कार्यक्रमासाठी काही दिवसांसाठी परगावी जाणाऱ्या कुटुंबातील श्वान, मांजरांची देखभाल करण्याचे काम या वसतिगृहाद्वारे होत होते. मात्र करोना संसर्गाच्या काळात त्यांनी आपल्या वसतिगृहाच्या उद्देशात बदल केला. त्याचा लाभ अनेक पाळीव प्राणी पालकांना सध्या होत आहे.

येथे होते काय?

’या वसतिगृहात चार कर्मचारी कार्यरत आहेत. येथे प्राणी मालकांकडून नाममात्र शुल्क आकारून श्वानांची देखभाल के ली जाते. ’श्वान, मांजराची अंघोळ, स्वच्छता, फिरवणे, वैद्यकीय गरजा या सगळ्याची काळजी घेतली जाते.

’अनेक रुग्णांच्या घरातील पाळीव प्राण्यांना गेल्या वर्षभरात येथे आणण्यात आले. घरातील रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपेपर्यंत प्राण्यांना येथे ठेवले जाते.

एखाद्या कु टुंबात करोनाचा संसर्ग झाल्यास आणि ती व्यक्ती घरातच विलग राहिल्यास अन्य सदस्यांनाही घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्या काळात दररोज श्वानाला फिरवायला नेणे, त्यांची वैद्यकीय काळजी घेणे या बाबत समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा उपक्रम राबवला. – पूजा गायकवाड