लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदार याद्यांचा घोळ पुढे आला आहे. या निवडणुकीसाठी नोंदणी झालेल्या सहा लाख पदवीधर मतदारांमध्ये अनेक नावे चक्क दुबार आहेत.
पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने केलेली मतदार यादी सदोष आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ७४ हजार होती. त्यापैकी ३० हजार मतदार कमी झाले असून यंदा मतदारांच्या संख्येत अडीच लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सहा लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. मतदार यादीमध्ये अनेक नावे दुबार झाली आहेत. एकाच व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, गावाचे नाव या नोंदी एकापेक्षा अधिक वेळा असल्यामुळे बोगस मतदानाची शक्यता निर्माण झाली आहे, याकडे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि उमेदवार हणमंतराव मोहिते यांनी लक्ष वेधले आहे.
मराठी आणि इंग्रजी अशा मतदार याद्यांतील अनुक्रमांकात तफावत आहे. मराठी यादीतील अनुक्रमांकावर असलेल्या व्यक्तीचे नाव इंग्रजी यादीमधील त्याच अनुक्रमांकावर नाही. त्यामुळे मतदारांना यादीतील त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार असून मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट होऊ शकते. निवडणूक आयोगाने दोन मतदान केंद्रातील अंतर १० किमीपर्यंत निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे अंतर २० ते २२ किमी आहे. त्यामुळेदेखील मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या बाबींसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना शुक्रवारी (१३ जून) निवेदन देण्यात येणार आहे. याची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असेही तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले.
 
विवाहित महिलांसाठी जाचक अट
विवाहित महिला पदवीधरांबाबत मतदार म्हणून नाव समाविष्ट करताना अर्जासोबत पुरावा म्हणून जोडण्यात आलेले त्यांचे पॅनकार्ड ग्राह्य़ धरले गेलेले नाही. विवाहानंतर नाव बदलल्याचे शासन राजपत्राची प्रत किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडण्याची जाचक अट घालण्यात आली आहे. आम्ही नोंदणी केलेल्या साडेतीन हजार महिलांमध्ये तीन हजार महिलांसंदर्भात हा प्रश्न उपस्थित झाला असल्याचेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.